नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीयांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कौतुक केले आहे. कोरोना काळात भारतीयांनी खूप चांगले काम केले. लोक एकमेकांच्या मदतीला धावून गेले. या काळात नागरिकांनी सेवाभावाचे दर्शन घडविले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. ते प्रवासी भारतीयांना संबोधित करीत होते. नवी पिढी भलेही मूळांपासून (भारतापासून) दूर झाली असली, तरी संबंध मात्र टिकून आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी (दि. 9) 16व्या प्रवासी भारतीय संमेलनाला संबोधित केले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जग साक्षीदार आहे जेव्हा जेव्हा भारताच्या सामर्थ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले गेले, तेव्हा तेव्हा भारतीयांनी ते चुकीचे ठरविले. भारत जेव्हा पारतंत्र्यात होता, तेव्हा युरोपातील लोक म्हणायचे भारत स्वतंत्र होऊ शकणार नाही, पण भारतीयांनी ते चुकीचे ठरविले. भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर पश्चिमेकडील लोक म्हणायचे इतका गरीब देश एकजूट राहू शकत नाही. येथील लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही, पण भारताने तेही चुकीचे ठरविले. आज भारतातील लोकशाही जगातील सर्वांत यशस्वी आणि जीवंत लोकशाही आहे. भारतीय लोकशाही जगासाठी उत्तम उदाहरण बनली आहे. शांततेचा कालखंड असो वा युद्धाचा भारतीयांनी निडरपणे सामना केला. दहशतवादविरोधी आघाडीवर भारताने दृढ निश्चयाने काम केले. मागील काही वर्षांत प्रवासी भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. विविध देशांचे प्रमुख हे सांगत असतात की, कठीण परिस्थितीतही भारतीयांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. आज भारतातील लशींची सगळे प्रतीक्षा करीत आहेत. भारताच्या सामर्थ्याचा लाभ सगळ्यांनाच मिळत आला आहे. देशात तयार करण्यात आलेल्या दोन लशी मानवतेच्या हितासाठी काम करण्यास सज्ज आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.