अलिबाग ः जिमाका
भारतीय साथरोग अधिनियम 1897मधील तरतुदीनुसार कोरोना विषाणूसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील परमिट रूम, डिस्को क्लब, बार पब्ज, लाइव्ह ऑर्केस्ट्रा व इतर दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी केले आहे. त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील मद्यविक्री दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथरोग अधिनियम 1897च्या कलम 2अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005च्या इतर सर्व तरतुदीनुसार 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. यादरम्यान नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, निधी चौधरी यांनी लागू केल्या आहेत.