Breaking News

बेकायदा तोडलेल्या झाडांची पाहणी; संबंधितांवर कारवाई करा -सभापती समीर ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल-सायन महामार्गावर कळंबोली सर्कलनजीक असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ महामार्गालगतची चार ते पाच जुनी झाडे कटरने तोडून बेकायदा नामशेष करण्यात आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन बेकायदा वृक्षतोड करणार्‍या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती समीर ठाकूर  यांनी केली आहे. या ठिकाणी समीर ठाकूर यांनी पाहणी केली. झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण संतुलित करा, असा मूलमंत्र देणार्‍या शासनाच्या डोळ्यांत धूळफेक करून 10 ते 15 वर्षे वयाची हिरवीगार व सावली देणारी महामार्गालगतची चार ते पाच मोठी झाडे दोन दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे तोडल्याने वृक्षप्रेमी तसेच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पनवेल-सायन महामार्गालगत असणारी मोठी झाडे तोडणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. महामार्गावर कळंबोली सर्कलजवळ असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ नेहमीच्या वर्दळीच्या स्थळी ही वृक्षतोड करण्यात आली आहे. कोणतेही झाड तोडण्याआधी त्याची रीतसर परवानगी घेतल्यानंतरच झाडे तोडता येतात. पनवेल-सायन महामार्गालगत चांगली सावली देणारी झाडे कशासाठी तोडण्यात आली याचा तपास वनविभाग, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पोलीस खात्याने करून यासाठी जबाबदार असणार्‍यांची कसून तपासणी करून दंडात्मक कारवाईची मागणी करण्याच्या दृष्टीकोनातून पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर यांनी या ठिकाणाची बुधवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी वृक्षतोड करणार्‍या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पाहणी दरम्यान नगरसेवक नरेश ठाकूर, शशिकांत शधेळके, यांच्यासह वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सुरेश रेसबुड मुन्ना भगत उपस्थित होते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply