उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) नौकानयन मंत्रालयाच्या ’सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत बहुउत्पाद विशेष आर्थिक क्षेत्र (मल्टीप्रॉडक्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन) (एसईझेड) विकसित करीत आहे. नवी मुंबई येथील जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या 277 हेक्टर जमीनीवर हे सेझ विकसित करण्यात येत आहे.
जेएनपीटी-सेझ साठीचा विकास आराखड्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे आणि नियामक प्राधिकरणाच्या (महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभाग) च्या प्रक्रियेनुसार 3 डिसेंबर, 2020 ते 1 जानेवारी, 2021 दरम्यान जेएनपीटी सेझच्या विकास आराखड्याच्या प्रस्तावावर लोकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. 15 जानेवारी रोजी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीने प्रकल्पाच्या आराखड्याच्या संदर्भात मेसर्स एनएसबीपीपीएलकडून आलेल्या सूचना ऐकून घेतल्या. त्या व्यतिरिक्त जमीनीच्या विद्यमान वापराचा नकाशा, प्रस्तावित झोन योजना व अहवालावर कोणतीही हरकत किंवा सूचना प्राप्त झाली नाही. त्यामुळे आता जेएनपीटीने सेझच्या विकास आराखडा प्रस्तावास अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सरकारची नियोजनबद्ध गुंतवणूक, पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा आणि जागतिक बाजारपेठेत अधिकाधिक प्रवेश मिळाल्यामुळे गेल्या काही वर्षांत सागरी उद्योगात झपाट्याने वाढ झाली आहे. मल्टि-प्रॉडक्ट बंदर आधारित जेएनपीटी सेझचे उद्दीष्ट सागरमाला अंतर्गत बंदर-आधारित औद्योगिकीकरण सक्षम करून निर्यातीला चालना देणे आहे. या सेझमध्ये 20 सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि एका मुक्त व्यापार वेरहाउसिंग झोनला (एफटीडब्ल्यूझेड) आतापर्यंत भूखंड वितरित करण्यात आले आहेत. पाच युनिटचे बांधकाम कार्य सुरू असून त्यापैकी दोन युनिट्सनी सेझमध्ये अलीकडेच यशस्वीरित्या काम सुरू केले आहे. जेएनपीटी सेझमधील तीन युनिट – मेसर्स ओडब्ल्यूएस एलएलपी, मेसर्स ओडब्ल्यूएस लिमिटेड आणि मेसर्स क्रिश फूड इंडस्ट्री (इंडिया) यांनी आपल्या कामकाजाचा पहिला टप्पा पूर्ण केला असून विकास आयुक्त, सीप्झ, एसईझेड यांनी जून 2020 महीन्यामध्ये हे युनिट्स कार्यरत झाल्याचे घोषित केले आहे. या तीन कंपन्यांव्यतिरिक्त आणखी चार कंपन्यांनी बंदरात बांधकाम सुरू केले आहे. जेएनपीटी एसईझेडमधील कंपन्यांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे.
एसईझेड पूर्ण क्षमतेने विकसित व कार्यान्वित झाल्यावर जेएनपीटी-सेझमध्ये चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि 57 हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील आणि एक लाख 50 हजार अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या एसईझेड प्रकल्पासाठी जेएनपीटीला विशेष योजना प्राधिकरणचा (एसपीए) दर्जा देखील देण्यात आला आहे.