मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी आता मुंडेंविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांपासून मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सहकार्य न केल्यास 20 फेबु्रवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.करुणा यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांच्याशी भेटू दिले जात नाही. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर जाताच मुंडे यांनी 30 ते 40 पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. यात माझ्या 14 वर्षांच्या मुलीचाही समावेश असून, तिथे महिला केअरटेकर नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यासाठी परवानगी द्या आणि मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करा.
मुंडेंचा पाय खोलात
धनंजय मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यात करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले होते, मात्र याच दुसर्या कुटुंबापासून ते आता अडचणीत आले आहेत.
आज माझा वाढदिवस आहे, परंतु माझ्या पतीने माझ्या मुलांना तीन महिने चित्रकूटमध्ये त्यांच्या बंगल्यात लपवून ठेवले आहे आणि मला भेटू, बोलूही देत नाहीत. राजकीय ताकदीचा दुरूपयोग केला जात आहे. रावणानेही इतका अत्याचार केला नसता.
-करुणा मुंडे, धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी