कर्जत : बातमीदार
तालुक्यातील रस्त्याच्या बाजूने भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून केबल टाकली जात आहे. सध्या माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गाच्या बाजूने केबल टाकण्याचे काम सुरू असून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत हे काम बंद पाडण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातील कोणत्याही रस्त्याच्या बाजूला केबल टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिली नाही आणि खोदकाम बंद करावे, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असे जाहीर करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता भारत दूरसंचार निगमकडून माथेरान- नेरळ-कळंब रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून केबल टाकली जात आहे. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत काम सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी खोदकाम थांबविले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आपल्या कार्यालयाने रस्त्याच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यास परवानगी दिली नाही असे स्पष्ट केले आहे. तालुक्यातील अन्य रस्त्यांच्या बाजूलादेखील बीएसएनएलकडून खोदकाम केले जात आहे. दरम्यान, महसूल विभागाने रस्त्याच्या बाजूला सुरू केले असलेल्या खोदकामाची पाहणी केली असून, नेरळ येथील मंडळ अधिकारी माणिक सानप, तलाठी गायकवाड आणि हिवरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले आहेत. मंगळवारी केबल टाकण्याचे काम बंद होते.
शासनाची किंवा स्थानिक ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता रस्त्याच्या बाजूला खोदकाम केले जात असल्याने आम्ही केबल टाकण्याचे काम अडविले आहे.त्यांनी रीतसर परवानगी घ्यावी आणि केबल टाकावी त्यास आमची हरकत असणार नाही.
-विजय हजारे, ग्रामपंचायत सदस्य, कोल्हारे, ता. कर्जत
आमच्या कार्यालयाने बीएसएनएलला कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नाही. तरीदेखील साईडपट्टी खोदून केबल टाकली जात आहे. साईडपट्टीमधील खोदकाम बंद करावे अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असे आम्ही बीएसएनएलला कळविले आहे. राज्यमार्गाच्या मध्यापासून 15मीटर अंतरावर खोदकाम करून केबल आणि पाईपलाईन टाकण्यास अर्ज केल्यानंतर रीतसर परवानगी दिली जाते.
-अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत