रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील वाशी येथील अनंत मगर यांनी कलिंगड पिकातून लाखोंचे उत्पादन काढुन तरुण शेतकर्यांपुढे आदर्श ठेवला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून अनंत मगर कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत. त्यांची स्वत:ची फार थोडी शेती आहे. त्यांनी धाटाव औद्योगिक क्षेत्राच्या बाजूच्या महादेववाडी येथील चाळीस एकर जमीन भाडेतत्त्वावर घेवून, तिथे विग्रो गोल्डन जातीच्या कलिंगड बियाण्याची लागवड केली. यंदा परतीच्या पावसाचा फटका अनंत मगर यांना काही प्रमाणात बसला. सुरुवातीच्या काळात आलेली कलिंगडची फुले गळून पडली. परंतु निराश न होता मगर यांनी आपल्या पत्नी व मुलांच्या सहकार्याने पिकाची चांगली देखभाल केली. त्यामुळे त्यांच्या शेतात जानेवारी अखेरपर्यंत कलिंगडाचे चांगले पीक तयार झाले. त्यांच्या शेतातील कलिंगड बाजारात दाखल झाले आहेत. अनंत मगर यांना यावर्षी चारशे टनाची उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र लांबलेल्या पावसामुळे काही प्रमाणात उत्पादन कमी आले. तरीसुद्धा जानेवारीअखेरपर्यंत त्यांनी 170टन कलिंगड स्थानिक बाजारातील विक्रेत्यांना विकले आहेत. अजुनही तेव्हढ्या उत्पादनाची त्यांना अपेक्षा आहे. मोठ्या व्यापार्यांकडून चांगला भाव मिळत नसल्याने या वर्षी मगर यांनी थेट स्थानिक विक्रेत्यांना कलिंगड विकण्याचे ठरवले. व्यापार्याकडून सात ते आठ रुपये प्रतीनग असा भाव मिळत होता, परंतु स्थानिक विक्रेत्यांकडे दहा ते अकरा रुपये प्रमाणे कलिंगड जात आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक विक्रेत्यांना बाहेरून येणार्या कलिंगडापेक्षा अनंत मगर यांच्याकडून कमी भावाने कलिंगड मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांचाही फायदा होत आहे. ठिबक सिंचन, बेंचिग पेपर, व लागवड खर्च मिळून मगर यांचा एकूण बारा लाखाच्या आसपास खर्च झाला आहे. हा खर्च वजा करता एका एकर मागे पन्नास ते साठ हजार रुपये नफा त्यांना अपेक्षित आहे. रोहा उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महामुनी, मिलिंद देवकर, विस्ताराधिकारी महारुद्र फडतरे, प्रशासन अधिकारी सुनील बोरसे, शेतकरी विकास प्रतिष्ठान अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे आदींनी मगर यांच्या शिवाराला भेट देऊन त्यांचे कौतुक केले.