मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील काशिद, मुरूड समुद्रकिनारा व ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर रविवारी (दि. 21) पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पर्यटक या ठिकाणी शनिवारपासूनच डेरेदाखल झाले. त्यामुळे हॉटेल व लॉजिंग हाऊस फुल्ल झाले होते.काशिद व मुरूड समुद्रकिनारी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असंख्य वाहने उभी असल्याचे दृश्य दिसले.
पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत आल्याने समुद्रकिनार्यावर समुद्रस्नान, घोडेस्वारी व समुद्री खेळ खेळण्यासाठी मोठी गर्दी पाहावयास मिळाली. पुणे, सातारा, औरंगाबाद व परभणी या ठिकाणांहून सर्वाधिक पर्यटक या ठिकाणी आले होते. मोठ्या गर्दीमुळे थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली, परंतु स्थानिक पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते.
याबाबत मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की, काशिद येथे वाढती पर्यटक संख्या पाहून येथे दोन पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरसुद्धा गर्दी झालेली दिसत असून येथेही दोन पोलीस तैनात केले आहेत. मुरूड तालुक्यातील या सर्वच ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने स्थानिकांच्या स्वयंरोजगारातही मोठी वाढ झाली आहे. समुद्रकिनारी असणारे अल्पोपाहार स्टॉल्सही गर्दीने तुडूंब भरले होते.