Breaking News

साहित्य कट्टातर्फे ऑनलाइन मराठी राजभाषा दिन

नवीन पनवेल : प्रतिनिधी

साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन पनवेलमधील साहित्य कट्टा या संस्थेच्या वतीने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात झाला. जगू मराठी…जागवू मराठी…मनामनात रुजवू मराठी या घोषवाक्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याच्या सभासदांनी विविध प्रकारच्या साहित्याचे पैलू उलगडून दाखवले.

प्रसिद्ध साहित्यिक शंकर आपटे यांनी प्राचीन मराठी साहित्याचा आढावा घेताना ओवी आणि अभंग या विषयांवर विवेचन केले. वैशाली केतकर यांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ या कवी कुसुमाग्रज लिखित गीताचे सादरीकरण केले. कवयित्री अपर्णा साठे यांनी मराठी भाषा गुणगानपर स्वरचित कविता सादर केली.

लेखिका पद्मजा कुलकर्णी यानी मराठी ललित साहित्यावर विवेचन केले. पद्मनाभ भागवत यानी तांत्रिक सहकार्य केले. नेहा आपटे, माधव भागवत व मैत्रेयी कुलकर्णी या युवा कलाकारांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. डॉ. कीर्ती समुद्र यांनी निर्मिती सहाय्य केले. या कार्यक्रमाला मराठी भाषाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रसिकांसाठी हा कार्यक्रम https://youtu.be/56-b15hZsKk  या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंदर्य व घरंदाजपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजीचा वापर अपरिहार्य आहे हे बरोबर, पण आपले संस्कार व संस्कृती चिरंतन राहण्यासाठी आपली मराठी भाषा टिकायलाच हवी. यासाठीच साहित्य कट्ट्याच्या वतीने अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

-शंकर आपटे, निर्माता, साहित्य कट्टा

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply