गेल्या 26 जानेवारी रोजी किसान आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीला भयानक वळण लागले. ऐन प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला. पवित्र तिरंग्याचा अपमान करण्यापर्यंत मोदीविरोधकांची मजल गेली. हे सारे उत्स्फूर्तपणे घडले नाही. त्या पाठीमागे निश्चित अशी रणनीती व कारस्थान होते हे आता दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने किसान आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना एक तपशीलवार टूलकिट ट्विटरवरून प्रसारित केले होते. टू लकिट म्हटले की सर्वसाधारणपणे पाना, स्क्रू-ड्राइव्हर, पक्कड असली
हत्यारे डोळ्यासमोर येतात. कुणाला मोटारीच्या डिक्कीतील पंक्चर काढण्याचे टूलकिटदेखील आठवेल, पण काळाच्या ओघात टूलकिट या शब्दाला एक वेगळा अर्थ लाभला आहे. सध्या चर्चेत असलेल्या टूलकिटमध्ये पाना, पक्कड ही अवजारे अजिबात नाहीत. त्यात वेगळेच काही विखारी असे आहे. सध्या राजधानी दिल्लीच्या सरहद्दीवर सुरू असलेल्या किसान आंदोलनाला जागतिक बळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. वास्तविक हे आंदोलन आहे पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांमधील शेतकर्यांचे, पण त्याला राष्ट्रीय नव्हे; तर आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्यात मोदीविरोधक यशस्वी झाल्यासारखे दिसते. अर्थात, विरोधकांचे हे यश क्षणभंगुर ठरणार हे वेगळे सांगायला नकोच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करता करता विरोधी पक्षाचे नेते कुठल्याही थराला जाऊ शकतात याचे ताजे उदाहरण म्हणून किसान आंदोलनाकडे बोट दाखवावे लागेल. आजकालच्या डिजिटल युगात टूलकिट या शब्दाचा अर्थ एखाद्या आंदोलनाची धोरणे, रणनीती आणि दिशा याचा तपशील असतो. भारत सरकारवर दबाव आणण्यासाठी जगातील सर्व कार्यकर्त्यांनी देशोदेशीच्या भारतीय दूतावासांसमोर उग्र आंदोलने छेडावीत वा डिजिटल मार्गाने भारताचा निषेध करावा असे आवाहनही ग्रेटा थनबर्गच्या त्या ट्वीटमध्ये होते. हे ट्वीट आणि त्यासोबतच्या टूलकिटचा तपशील बंगळुरू येथे कार्यरत असलेल्या दिशा रवी नावाच्या 21 वर्षीय तरुणीने संपादित केलेला होता असे तपासात निष्पन्न झाले. दिल्ली पोलिसांनी तातडीने पावले उचलत दिशा रवी हिला अटक केली. तिच्यासोबत आणखी काही भारतीय युवक-युवती आपल्याच देशाला बदनाम करण्याच्या या व्यापक कारस्थानात सामील आहेत, असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. काँग्रेससहित काही राजकीय पक्षांनी दिशा रवी हिच्यावरील कारवाईचा निषेध केला आहे. या संदर्भात योग्य त्या चौकशीअंती सत्य बाहेर येईलच, परंतु यामधून निर्माण होणारे काही प्रश्न भारताची चिंता वाढवणारे आहेत हे मात्र खरे. भारत हा जगातील सर्वांत अधिक तरुण लोकसंख्या असलेला देश मानला जातो. साहजिकच समाजमाध्यमांच्या प्रसारासाठी भारतीय भूमी ही सुवर्णभूमीच ठरावी, शिवाय भारतात जगातील सर्वांत मोठी लोकशाही व्यवस्थादेखील आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत थोडासा आरडाओरडा केला तरी काम भागते. अशा परिस्थितीत काही आंतरराष्ट्रीय भारतविरोधी शक्ती भारतीय तरुणाईला हत्यार म्हणून वापरत आहेत की काय, अशी भीती काही जाणकार व्यक्त करतात. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता भीतीच्या या भावनेत तथ्य आहे असे वाटू लागते. थोडक्यात सांगायचे म्हणजे, भारतविरोधी शक्तींचे भारतीय तरुणाई हेच एक टूलकिट आहे असे म्हणावे लागेल. हे खरे ठरले तर भविष्यातील आव्हान निश्चितच मोठे आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …