Breaking News

रायगडात महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा -अश्विनी पाटील

खोपोलीत खरेदीसाठी आलेल्या महिलांचे भाजपतर्फे स्वागत

खोपोली : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून  खोपोलीतील दीपक चौकात सोमवारी खरेदीला आलेल्या महिलांचे भाजप महिला मोर्चातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे खरेदीला आलेल्या महिलांनाही आश्चर्याचा धक्का बसला व त्यांनी भाजप महिला मोर्चाचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरता अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत, त्याचा महिलांनी लाभ घेत कुटुंबाचा आर्थिक विकास करावा व स्वतःबरोबर देशाचाही विकास करावा, असे आवाहन रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी या वेळी केले.

खोपोलीतील दीपक चौकात झालेल्या या समारंभाला भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षा शोभा काटे, माजी अध्यक्षा रसिका शेटे, नगरसेविका अपर्णा मोरे, नगरसेवक तुकाराम साबळे, स्नेहल सावंत, सुनिती महर्षी, शहर भाजप खोपोली शहराध्यक्ष इंद्रमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, सहचिटणीस गोपाळ बावस्कर, शहर उपाध्यक्ष चंद्रप्पा अनीवार  यासह अनेक  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महिलांबाबतचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे -जिल्हाधिकारी

अलिबाग : प्रतिनिधी

आपल्या देशात दर 16व्या मिनिटाला एका महिलेवर अत्याचार होतो. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी महिलांबाबतचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे तसेच महिला विषयक कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलिबाग येथे व्यक्त केले.

जागतिक महिला दिन्याच्या पूर्वसंध्येला अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने आयोजीत केलेल्या तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाधिकारी निधी चौधरी बोलत होत्या. रूढी परंपरामुळे महिला अबला समजल्या जात आहेत. मात्र महिला पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत, याबाबत समाजातील संवेदनशीलता वाढली तर परिस्थिती बदलेल. समाजात हा बदल घडवून आणण्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे निधी चौधरी या वेळी म्हणाल्या.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात डॉ. अपुर्वा पाटील, परिचारीका दक्षता चौगले. बस वाहक करुणा ठाकूर, पोलीस कर्मचारी आरती राऊत आणि सामाजिक कार्यकर्ती निशा नायक यांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रे हिलाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी शारदा पोवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनीदेखील या वेळी आपले विचार व्यक्त केले.

असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश भोस्तेकर यांनी केले. सूत्रसंचलन महेश पोरे यांनी केले. प्रमोद जाधव यांनी आभार मानले.

नागोठण्यात महिला शिक्षकांचा गौरव

नागोठणे : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात इंजिनिअरिंग विभागात विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिला शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयात शासनाकडून देण्यात आलेले महत्वपूर्ण उपक्रम महिला शिक्षकच राबवित असून आमच्या सोसायटीच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असल्याचे किशोर जैन यांनी या वेळी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

सोसायटीच्या उपाध्यक्षा संगीता जैन, संचालक कार्तिक जैन आणि प्रियांका जैन, भाएसोच्या डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य विपिनकुमार, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या अनघा सामंत, वैभव नांदगावकर, पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, पाली सुधागडच्या पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे आदी मान्यवरांसह विद्यासंकुलातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

माणगावात महिलांसाठी व्यायामशाळा

माणगाव : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माणगाव शहरातील आदर्श समतानगर विकास कॉलनीत सोमवारी (दि. 8) महिला व्यायामशाळेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

माणगाव नगरपंचायतीच्या नगरोत्थान फंडातून आदर्श समतानगर विकास कॉलनीतील समतानगर हॉलशेजारी महिलांसाठी सुसज्य व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. व्यायामशाळेचे संचालक अनिकेत कदम व त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थितांचे स्वागत केले. महिलांना व्यायाम शाळेचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षिका सुरेख दांडेकर यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दिलीप उभारे यांनी केले.

वांगणी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा रंगल्या

नागोठणे : प्रतिनिधी

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या वांगणी माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोमवारी चित्रकला, प्रश्नमंजुषा, नाटिका अशा  विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांतून व सादर केलेल्या नाटिकांमधून ’लेक वाचवा … लेक शिकवा’, ’स्त्री भ्रूण हत्या थांबवा’, ’महिलांचे सबलीकरण’, ’स्त्री – पुरुष समानता’, ’स्त्री मुक्ती चळवळ’, ’स्त्रियांचे हक्क’ यासारख्या बाबी अभिव्यक्त केल्या. प्रश्नमंजुषा स्पर्धेतून  साहित्य,  कला, क्रीडा, विज्ञान,  इतिहास,  सामाजिक कार्य, राजकारण, शिक्षण आदी क्षेत्रांतील महिलांच्या कर्तृत्वाच्या आढावा घेण्यात आला. मुख्याध्यापक जे. एन. ठाकूर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

महिलांची नेत्रतपासणी

खालापूर : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील स्नेहबंधन स्वयंसिध्दा महिला मंडळ व सनशाईन आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 8) खोपोलीतील मुकुंद स्वानंद सोसायटीमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 90जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.

 मंडळाच्या अध्यक्ष जयश्री विलास चाळके, उपाध्यक्ष वैशाली गोते, रुपाली बनसोड, रेखा शिंदे, रेणुका पादीर, वैशाली पडवळ, अश्वीनी दरेकर, वासंती पाटील, योगिता मालूसरे, सायली मोरे, सारिका किर्वे, सुनयना पारठे तसेच सनशाईन आय केअरचे डॉ. पांडुरंग जी. निकम  व कर्मचार्‍यांनी हे नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply