Breaking News

रोह्यात प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्याचा शुभारंभ

रोहे : प्रतिनिधी
सरकारने कृषी विभागासाठी अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद केली आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही. आंब्याचे मोठे नुकसान यावर्षी झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. कोकणातील शेतकर्‍यांसाठी सुपारी संशोधन केंद्राला व काजू प्रक्रिया यासाठी निधी देण्यात येईल. यांसह काढणी पश्चात तंत्रज्ञान या विद्यालयात पीएचडीला तत्वतः मान्यता देत असून यासाठी जे लागेल तो निधी आम्ही मंजूर करू. विद्यापीठानेही शेतकर्‍यांचे हित समोर ठेवून भातावर संशोधन करावे असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
रोहा किल्ला येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे उद्घाटना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सात कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्यात येईल. यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करीत रखडलेल्या इमारतीचं काम लवकरात लवकर करावे असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, विजय मोरे, विनोद पाशिलकर, शिवसेना तालुकाप्रमुख अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, किल्ला सरपंच योगेश बामुगडे, डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठचे संशोधन संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. बाळकृष्ण देसाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, कृषी विज्ञान केंद्र किल्लाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. मनोज तलाठी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी, कोकणातील आंबा पिकावर सातत्याने रोगराई येत असल्याने आंबा उत्पादन कमी होताना दिसत आहे. त्यामुळे विद्यापीठाने यावर संशोधन करण्याची आवश्यकता आहे. शालेय शिक्षणात कृषी शिक्षणाचा अभ्यास समाविष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे सांगत शासन व विद्यापीठ यांच्यात समन्वय असणे आवश्यकता असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात प्रमोद सावंत यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, शेतकर्‍यांचे कौशल्य वाढवणे आदी उपक्रम राबवीत असल्याचे सांगत भुईमूग, मत्स्य शेती, भाजीपाला, शेळीपालन या उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र काम करीत असल्याचे सांगितले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय सावंत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकर्‍यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply