पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आवाहन
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. सावधगिरी बाळगूया कोरोनाला टाळूया, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
अलिकडच्या काही दिवसांत कुटूंबातील सर्व सदस्य बाधित असल्याचे दिसून येत असल्याने धार्मिक, कौटुंबिक, सणासुदीच्या कार्यक्रमातही शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन नागरिकांनी पालन करावे, असे आयुक्तांनी आपल्या आवाहनात सांगितले आहे. 10 मार्च 2020 रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्याला आता एक वर्ष पुर्ण झाले. गेल्या वर्षभरात मधल्या काळात कोरोनाच्या रुग्ण वाढीचा आलेख दररोज 300 पर्यंत वरती जाऊन दररोज 25 पर्यंत खाली आला होता. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे.
या बरोबरच राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या आधी माझे कुटूंब माझी जबाबदारी आणि आता मी जबाबदार या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन ही आयुक्तांनी केले. गेल्या वर्षभरात महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अहोरात्र काम करून कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. सध्या कोरोनाबाबत काही नागरिकांत कमी झालेले भय आणि नियम पाळण्याबाबत होत असलेल्या कुचराईमुळे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
लोकांनी मास्क, सामाजिक अंतर, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे, गरज असेल तेव्हाच बाहेर पडणे अशा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर कोणी अशा नियमांचे उल्लंघन करताना अढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात असल्याचेही आयुक्तांनी आपल्या आवाहनात सांगितले आहे.
आस्थापनांच्या सेवेत निर्बंध
महापालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी विविध पातळ्यावरती प्रयत्न करत आहे. खाजगी आस्थापना रात्री 10 वाजेपर्यंत तर उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार, कॅफे, डायनिंग हॉल अशा ठिकाणच्या सेवा 50 टक्के क्षमतेसह रात्री 11 वाजेपर्यंत आणि मॉल्सहीत सर्व प्रकारची दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.