पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल शहरात आणि तालुक्यात असलेल्या रोटरी क्लब्जनी समाजाला काही तरी देण्याची निकोप स्पर्धा केली तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील. रोटरी क्लबचे हे सेवाकार्य पनवेलकरांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 11) केले. ते आरोग्य साहित्याच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यात आलेल्या सहा शवपेट्या, जनरेटर सेट, फिजिओथेरपी साहित्य, एक्स-रे रूम लेड पार्टिशियन आणि अपघात विभाग ऑपरेशन थिएटरमध्ये सी-आर्म युनिट आदी साहित्याचे लोकार्पण आमदार रोटेरिअन प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनासंबंधी नियमांचे पालन करून महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या प्रोजेक्टसाठी सहकार्य करणारे रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन सुधीर कांडपिळे, क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद गांधी, डॉ. प्रकाश पाटील, प्रकाश श्रृंगारपुरे, कंत्राटदार राहुल नाईक आणि बिपीन शाह आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, डॉ. बसवराज लोहारे, ट्रस्टचे सचिव राजेंद्र ठाकरे, क्लबचे अध्यक्ष हर्मेश तन्ना, सचिव कल्पेश परमार, डॉ. एन. सी. जनार्दन, अलीभाई व्होरा, डॉ. संपत ससाणे, सैफुद्दीन व्होरा, प्रमोद वालेकर, हितेन राजपूत, जितेंद्र बालड, नीलम शाह, ध्वनी तन्ना आदी मान्यवरांसह बहुसंख्य रोटेरियन्स व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव या रुग्णालयाला दिलेले आहे. त्यांनी रायगड जिल्ह्यात लोकसेवेच्या कामाचा महासागर उभारला. त्याचे भान ठेवून आपल्याला येथे सेवा द्यायला पाहिजे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून दिला. म्हणून या रुग्णालयाचे काम पूर्ण करता आले. या रुग्णालयाचे काम रखडले तेव्हा नगरसेवक राजू सोनी यांनी त्याच्यावर शेवटचे दोन महिने काम पूर्ण होईपर्यंत देखरेख ठेवली असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, या रुग्णालयाच्या बांधकामाच्या दर्जाबद्दल समाधानी नसलो तरी आता जे आहे त्याच्यातून पुढे जाताना झालेल्या त्रुटीतून मार्ग काढत पुढे जायचे आहे. त्याची सुरुवात रोटरी क्लबने पुढाकार घेऊन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन त्या क्लबचे आपण सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल म्हणाल्या की, खर्या अर्थाने पनवेल महापालिकेचा कोविडचा भार पनवेल उपजिल्हा रुग्णालयाने उचलला आहे. आता लसीकरणाचाही भार त्यांच्यावर टाकला आहे.एवढ्या चांगल्या सुविधा येथे उपलब्ध होत असल्याने गरीब सामान्य रुग्णाला चांगली सेवा मिळून तो बरा व्हायला पाहिजे, अशी इच्छा आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी रुग्णालयातील सुविधांची माहिती देऊन सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी या रुग्णालयात आता रक्तपेढीची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणजे कोणतीही शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना अडचण येणार नाही. रोटरी क्लबचे काम चांगले आहे. त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहो.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर