खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण सापडलेल्या खोपोली शहरातील नगर परिषदेच्या रूग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर एप्रिल महिन्यात खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला होता. त्यानंतर वर्षभरात केवळ खोपोली नगर परिषद हद्दीतच 80 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन महिने शांत असलेला कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने सध्या भीतीचे वातावरण आहे.
समाधानाची बाब म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण सुरू झाले असून काही खाजगी रूग्णालयांनादेखील शासनाने लसीकरणाची परवानगी दिली आहे. मात्र खालापूर तालुक्यात एकाही खाजगी रूग्णालयाला लसीकरणाची परवानगी नाही. खोपोलीतील नागरिकांचे सध्या कर्जत उपजिल्हा रूग्णालय आणि सोमवारपासून खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येत आहे. खोपोली शहराचा आवाका आणि लोकसंख्या पाहता येथील नगर परिषदेच्या रूग्णालयातदेखील लसीकरणाची सोय होणे, अत्यावश्यक आहे.
अद्याप आम्हाला लसीकरणाबाबत सूचना प्राप्त नाहीत. शासनाकडून जर आदेश आले तर खोपोली नगर परिषद रूग्णालयातदेखील लसीकरण होवू शकेल.
-डॉ. संगिता वानखेडे, खोपोली नगर परिषद रूग्णालय
खोपोली शहरात पुन्हा कोरोना रूग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. रेल्वे, शाळा, महाविद्यालयात तालुक्यासह बाहेरून येणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खोपोलीत वेळेवर लसीकरणाला सुरूवात झाल्यास येथील ज्येष्ठ, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींची फरफट थांबेल.
-गजानन गायकवाड, दिलासा फाऊंडेशन
खोपोली शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणे आवश्यक आहे. परंतु आमच्याकडे तसा स्टाफ उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे खोपोलीत लसीकरणाला मुहूर्त मिळत नाही.
-डॉ. प्रसाद रोकडे, तालुका वैद्यकिय अधिकारी, खालापूर