अहमदाबाद ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या उत्सवाला शुक्रवारी (दि. 12) प्रारंभ केला. पंतप्रधान मोदींनी साबरमतीमध्ये अमृत महोत्सवाचा शुभारंभ केला. यासह गुजरातमध्ये सहा ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंतप्रधानांनी साबरमती आश्रमपासून 386 किलोमीटर लांब दांडी मार्चला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली, तसेच पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या ऐतिहासिक महापुरुषांचे स्मरण केले. भारत या महापुरुषांच्या स्वप्नातील देश बनवण्यासाठी पुढे जात आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी देशातील तरुण, विद्वान, कलाकार आणि साहित्यजगातील लोकांना स्वातंत्र्य आंदोलन, सैनिकांच्या गोष्टी आणि त्या वेळचा इतिहास लिहिण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या उत्सव सर्व मिळून मोठ्या उत्साहात साजरे करू या, असेही त्यांनी या वेळी म्हटले.