नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
झपाट्याने वाढणार्या नागरी लोकसंख्येची लोकसेवा करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पालिकेला मंजूर आकृतिबंधानुसार आणखी सातशे कर्मचारी, अधिकारी आवश्यक असून, प्रत्यक्षात मात्र ही संख्या दीड हजारांच्या घरात जात आहे. करोना काळात आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचार्यांची भरती करण्यात आली असली, तरी ही भरती तात्पुरती असून कायमस्वरूपी भरती करणे आवश्यक आहे.
पालिका क्षेत्रात एकूण आठ प्रभाग असून प्रत्येक प्रभाग अधिकारी हा कमी कर्मचारी असल्याची तक्रार करीत असून तशी पत्रे प्रशासनाला देण्यात आली आहेत. सध्या पालिकेत एकूण 3300 कायमस्वरूपी तर सात हजार कंत्राटी कामगार आहेत. नवी मुंबई पालिकेत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या आजूबाजूच्या शहरांपेक्षा कमी कायमस्वरूपी कर्मचारी असून पालिकेने कंत्राटी कामगारांवर भर दिला आहे. समान काम समान वेतन धोरणानुसार साफसफाई कामगारांना कायम करण्यात आलेले नाही.
नवी मुंबई पालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून ती 15 लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे पालिकेतील प्रभाग कार्यालय, तसेच इतर विभागांवरील ताण वाढला असल्याने प्रत्येक प्रभाग कार्यालयातून कमी कर्मचार्यांची तक्रार प्रशासनाकडे येत आहे. कोविड काळ आणि राज्य शासनाची भरतीसाठी लागणारी मंजुरी पाहता पालिकेतील अनेक विभागांत कर्मचारी अधिकारी भरती झालेली नाही. राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी पालिकेसाठी आकृतिबंध मंजूर केलेला आहे. त्यासाठी लागणारी सेवा शर्ती नियमावलीदेखील तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार पालिकेत उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने शासकीय अधिकारी आलेले आहेत तरीही ही संख्या अपुरी असल्याने काही अधिकार्यांवर एकापेक्षा जास्त विभागांची जबाबदारी आहे. आकृतिबंधात साहाय्यक आयुक्त पदांची संख्या 20 आहे, पण ही पदेदेखील भरली गेलेली नाहीत. पालिकेत अनेक वर्षे काम करणार्या अधिकार्यांना किमान साहाय्यक आयुक्त पदावर बढती मिळेल अशी आशा लागून राहिलेली आहे.
चार वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आकृतिबंधात पालिकेला 3900 कर्मचार्यांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, मात्र आजच्या घडीस केवळ तीन हजार 300 कर्मचारी कायमस्वरूपी असून यात 700 कर्मचार्यांची कमतरता आहे. आकृतिबंधाप्रमाणे ही संख्या कमी असून प्रत्यक्षात पालिकेसाठी आता उपायुक्त ते शिपाई या पदांवर सुमारे एक हजार 500 कर्मचारी व अधिकार्यांची आवश्यकता आहे. कमी कर्मचारी व अधिकारी संख्येमुळे पालिकेतील कर्मचारी व अधिकार्यांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. आरोग्य विभागात तर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती, पण करोना काळात करण्यात आलेल्या तातडीच्या भरतीमुळे हा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. तरीही वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात सद्यस्थितीत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्यांचा तुडवडा जाणवत आहे.
पालिकेतील कमी अधिकारी संख्येमुळे दोन आतिरिक्त व आठ उपायुक्त यांच्याकडे अनेक विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. साहाय्यक आयुक्त पदासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. पालिकेत प्रतिनियुक्तीविरुद्ध कायमस्वरूपी अधिकार्यांमधील मतभेदाचे प्रमाण वाढले आहे. काहीजण अनेक वर्षे एका विभागात तळ ठोकून बसले आहेत.
पदोन्नती, बदली प्रक्रिया लवकरच
पालिकेतील पदोन्नतीसाठी 221 संर्वग आहेत. यातील 86 संवर्गाने पदोन्नती देणे शक्य आहे. 22 संवर्गाने पदोन्नती देण्यासाठी सध्या पदोन्नती समितीच्या बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे पालिकेत गेली अनेक वर्षे सेवा देणार्या काही अधिकार्यांना पदोन्नती देण्याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर अनुकूल आहेत. करोनाकाळात या कर्मचार्याकडून केवळ सेवा घेण्यात धन्यता न मानता त्यांना काही तरी देणे आवश्यक असल्याची भूमिका आयुक्तांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे पालिकेतील काही अधिकर्यांना लवकरच पदोन्नती तर काही जणांची बदली होणार आहे.
सध्या 3300 कर्मचारी, अधिकारी कायमस्वरूपी आहेत. यात आणखी सातशे जणांची आवश्यकता असून करोना काळात आरोग्य विभागात तातडीने भरती करण्यात आल्याने ही सेवा सक्षम करण्यास हातभार लागला आहे. पदोन्नतीसाठी प्रस्ताव तयार असून लवकरच निर्णय घेणार आहे.
-दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई पालिका