Breaking News

पनवेलमध्ये वाढत्या कोरोनामुळे कामगारांना लॉकडाऊनची भीती

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात झालेल्या टाळेबंदीला एक वर्ष पाच दिवस पूर्ण झाले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात  कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज 200पेक्षा जास्त  रुग्ण आढळत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर बहुतांश नागरिकांकडून कोरोनापेक्षा लॉकडाऊनची भीती जास्त वाटत असल्याचे मत व्यक्त करत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल कोरोना सर्वाधिक रुग्ण आहेत. मार्च महिन्यात कोरोना झालेल्या रुग्णांचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. त्यानुसार इतर जिल्ह्यात लॉकडाऊन होत असल्याने पनवेलकरांमध्ये  धाकधूक वाढली आहे. गेल्या 24 दिवसांत तीन हजार 569 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. गत वर्षीच्या प्रमाणात यावर्षी झपाट्याने वाढ होत आहे. अशीच वाढती संख्या असेल तर लॉकडाऊन नक्की लागेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पुन्हा हातावर पोट असणार्‍यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, हॉटेल व्यावसायिक, विविध आस्थापनातील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारी कामगार, नोकरदारवर्ग  लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. कोरोना झालेला बरा, पण लॉकडाऊन नको, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. कित्येकांच्या नोकर्‍या या लॉकडाऊनमुळे हिरावल्या गेल्या आहेत. आता परत मागील दिवस नकोत, अशी भावना नागरिकांमधून उमटत आहे.

गावी जाणार्‍यांच्या संख्येत वाढ

चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गावी जाणार्‍या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या भीतीने आपण मुंबईत अडकून राहू नये, याकरिता येथून काढता पाय घेतला जात आहे. बिगारी कामगार, रोजंदारीवरील कामगार, गरीब मजूर मोठ्या प्रमाणात गावाकडे वाटचाल करत आहेत.

दररोज बिगारी काम करुन माझे व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. गतवर्षी लॉकडाऊन काळात पायीच गाव गाठले होते. टाळेबंदीनंतर कामाला सुरुवात झाली म्हणून मी परत पनवेलला आलो. पनवेलमध्ये लॉकडाऊन लागेल, अशी भीती वाटते

-अनिल राठोड, कामगार

गेल्यावर्षी माझी नोकरी गेली. आता तळोजा एमआयडीसी येथे रोजंदारीवर काम करत आहे. कोरोना वाढत आहे. लॉकडाऊन होईल, अशी भीती वाटते. हातावर पोट आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको. गतवर्षी खूप हाल झाले आहेत.

-अविनाश तोंडरे, कामगार

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply