सहकार आयुक्तांचे बँकेला आदेश
आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या तारांकित प्रश्नाला सहकार मंत्र्यांचे उत्तर
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील व व्यवस्थापनाने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असून या बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तत्काळ परत करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी कर्नाळा बँकेला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री श्याममराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सर्व शाखांत आर्थिक गैरव्यवहार झाला असून, बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि संचालक मंडळाने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता.
या प्रश्नावर सहकारमंत्री श्यामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सर्वच शाखांत आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. यासंदर्भात जिल्हा विशेष लेखापरीक्षक संस्था, अलिबाग, रायगड यांनी 19 डिसेंबर, 2019 रोजी सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांना सादर केलेल्या अहवालात 512 कोटी 54 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले असून, सदर गैरव्यवहारात कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा अॅकॅडमीचादेखील समावेश केला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या 22 एप्रिल 2019 रोजीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960मधील तरतुदीनुसार सदर बँकेचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले आहे. सदर लेखापरीक्षण अहवालानुसार एकूण 63 कर्जप्रकरणांत 512.54 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले असून त्यापैकी 17 कर्ज प्रकरणांमधील रक्कम कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा अॅकॅडमी यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग झाल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून निदर्शनास येत आहे. या प्रकरणी हजारो ग्राहकांना व ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळत नसून वारंवार मागणी करूनही धनादेश किंवा आरटीजीएसद्वारेही पैसे मिळत नाहीत. बँकेच्या ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने बँकेच्या ठेवीदारांना तत्काळ ठेवी देण्याबाबत सहकार आयुक्तांनी बँकेस आदेश दिले आहेत. अधिनियमातील कलम 81अन्वये आथिक गैरव्यवहारास जबाबदार असणार्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकार्यांनी 21 जानेवारी 2020 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल पोलीस स्टेशन, पनवेल यांना फिर्याद दाखल करण्याबाबत पत्र दिले असून त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. बँकेस झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्यासाठी अधिनियमातील कलम 88अन्वये कार्यवाही करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड यांची 4 फेब्रुवारी रोजीच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे, असेही लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले असून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते विवेक पाटील, संचालक व व्यवस्थापनावर घोटाळ्याचे
ताशेरे ओढले आहेत.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमीचीही चौकशी होणार
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत घोटाळा करणारे शेकाप नेते व माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमीची चौकशी करण्याचे आश्वासन राज्याचे धर्मादाय आयुक्त आर. एन. जोशी यांनी दिले आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत शेकाप नेते व माजी आमदार विवेक पाटील व संचालक मंडळाने 63 व्यक्तींच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून 512.54 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था अलिबाग रायगड यांनी आपला चौकशी अहवाल सहकार खात्यास सादर केला असून त्या अनुषंगाने बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील, संचालक मंडळ, अधिकारीवर्ग व बेनामी कर्जदार अशा एकूण 76 जणांवर भादंवि कलम 409,417, 420, 463, 465, 467, 468, 471, 477, 201, 120 (ब), 34, सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 147, सहकारी महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 199चे कलम 3 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था अलिबाग-रायगड यांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट केले की, ज्या 63 व्यक्तींच्या नावे बोगस कर्ज दाखवले, त्या कर्ज खात्यातील बर्याच रकमा कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमी या संस्थांकडे वर्ग झाल्याचे नमूद केले आहे. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमी या संस्था महाराष्ट्र विश्वस्त अधिनियम 1950अन्वये नोंदलेल्या असल्याने व कर्नाळा बँकेत झालेल्या अपहारापैकी बर्याच रकमा या दोन्ही संस्थांकडे वर्ग झाल्याने सदरच्या संस्थांतूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्कम उचलून त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला असावा. त्यामुळे या दोन्ही संस्थांची महाराष्ट्र विश्वस्त अधिनियम 1950 कलम 37नुसार लेखापरीक्षण करून कलम 33(4)अन्वये चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, कुंडलिक काटकर यांनी महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. त्यावर कर्नाळा चॅरिटेबल व कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमीची धर्मादाय आयुक्त कार्यालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले असून काही अनागोंदी आढळल्यास संबंधित दोषींवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.