Breaking News

नागोठणे, माणगावात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

नागोठणे : प्रतिनिधी

शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढच होत आहे. मंगळवारी (दि. 6) सकाळपर्यंत दहा रुग्ण वाढले असून त्यात नागोठणे शहरात आठ आणि दोन विभागातील पाटणसई येथील आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 47 इतकी झाली आहे. त्यापैकी सहा रुग्णांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील रुग्णालयात हलविले आहे. नागोठणे शहरासह विभागात साखरपुडा, लग्न सोहळे अद्यापही धुमधडाक्यात साजरे होत असल्याचे असल्याने त्यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. नाही तर, कोरोना रुग्ण आटोक्यात आणणे हाताबाहेर जातील, असा इशारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिला. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असून त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी शहरात फिरून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. शहरात मास्क न लावणार्‍यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या या मोहिमेत मंगळवार दुपारपर्यंत विनामास्क फिरणार्‍या 135 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे सरपंच डॉ. धात्रक यांनी स्पष्ट केले.

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासन पूर्णपणे हतबल झाले आहे.  माणगाव तालुक्यात सोमवारी (दि. 5)  सायंकाळी पाच वाजेपर्यंत  27 कोरोना रुग्णांची आढळले असल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 127 झाली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी तपासणी केलेल्या 91 पैकी 64 रुग्णांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असून, त्यात माणगाव शहर 12, इंदापूर व निजामपूर प्रत्येकी पाच, भिरा दोन तर लोणेरे, विघवली, कवीळवहाळ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply