नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंताजनक आहे. अशातच रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत बेड्स मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यामुळे शहरातहील तब्बल 11 हजार 605 इतके रुग्ण उपचाराधीन आहेत, तर एकीकडे पालिका प्रशासन खाटांच्या संख्येत वाढ करत आहे. नवी मुंबईत सध्या दररोज एक हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत असून विषाणूचा झपाट्याने प्रसार होऊ लागला आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांमुळे 20 ते 25 जण बाधित होत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या 80 हजारांवर पोहचली आहे. यामध्ये गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी रुग्णालयातील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये खाटा अपुर्या पडू लागल्या आहेत. उपचाराधीन रुग्ण मागील तीन आठवड्यात जवळजवळ तीनपटीपेक्षा जास्त वाढले आहेत. कोरोनाच्या या दुसर्या लाटेमध्ये 20 ते 40 वयोगटांतील नागरिकांना अधिक प्रादुर्भाव होत असल्याचे चित्र आहे. कोरोनामुक्तीचा दर हा 96 टक्क्यांवरून पुन्हा खाली आला आहे.
अपुर्या ऑक्सिजनमुळे उपचार झाले कठीण
नवी मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सद्य:स्थितीला नवी मुंबईत साडे 11 हजारांच्याहून जास्त रुग्ण उपचाराधी आहेत, तर बहुतांश रुग्णांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने बेड्स मिळण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे, तसेच शहरात वाढत्या रुग्णसंख्येसह गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले असून कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागणार्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. उपचार घेणार्या रुग्णांना अपुर्या ऑक्सिजनअभावी उपचार घेणे कठीण होत आहे.
नवी मुंबईत मागील काही आठवड्यात नवे रुग्णांची संख्या तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या पटीत वाढली आहे. पालिका प्रशासन सर्व प्रकारच्या खाटा वाढवत असून नागरिकांनीही महापालिकेला कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी घालून दिलल्या नियमावलीचे पालन करावे आणि पालिकेला सहकार्य करावे. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पालिका या खाटांची संख्याही वाढवत आहे. खाटांची स्थिती दर्शवणारे पोर्टलही वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहे.
-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका