पनवेल : वार्ताहर
पनवेलजवळील रोडपाली येथील रिलायन्स स्मार्ट पॉईंट मॉल येथून दोन अनोळखी व्यक्तींनी जेमिनी खाद्य तेलाचे व इतर साहित्य खरेदी करून एनइएफटीद्वारे पेमेंट करण्याचा बहाणा करून ट्रान्झेक्शनचा खोटा संदेश दाखवून रिलायन्स मॉलची फसवणूक केली होती. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होताच पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाने या आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान कक्ष 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक वैभव रोंगे, हवालदार अनिल पाटील यांनी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज, ट्रान्झेक्शनचा मेसेज आलेले अकाऊंट व इतर तांत्रिक बाबीचा तपास करून गुन्हयातील आरोपी यासिन मोहंमद गुलाम राहिमान शेख (वय 28, रा.ठी.डायमंड बिल्डिंग,शिळफाटा, मुंब्रा) व दिलीप भैरव गुप्ता (वय 24, रा.ठी.नायरचाळ, खंडोबा मंदिर, महाराष्ट्र नगर, मानखुर्द, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याबाबत अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील, पोलीस उपआयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी आरोपीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीबाबत सखोल तपास करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी या आरोपींकडे सखोल तपास करता नमूद आरोपी हे वेगवेगळ्या किराणा दुकानात व मॉलमध्ये जाऊन सामान खरेदी करतात. त्याचवेळी ज्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स नसतो त्या अकाऊंटमध्ये नमूद दुकानातील पेटीएम स्कॅन करतात. स्कॅन केल्यानंतर अगोदर ट्रान्झेक्शन झाल्या बाबतचा मेसेज येतो. तोच मेसेज आरोपी संबंधित दुकान मालकास दाखवतात व घाई असल्याचे दाखवून तिथून पसार होतात. त्यानंतर काही वेळातच ट्रान्झेक्शन फेलचा मेसेज संबंधितांना येतो. अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. त्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता नमूद आरोपींनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली. गुन्ह्यातील संपूर्ण माल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे कळंबोली परिसरातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना अटक करण्यामध्ये हवालदार अनिल पाटील, नाईक कानू, रुपेश पाटील, सचिन म्हात्रे यांनी मेहनत घेतली.