Breaking News

सुधागडला गारपीटीसह वादळी पावसाचा तडाखा

घरांचे मोठे नुकसान; झाडे, विजेचे खांबही कोसळले

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्याला मंगळवारी (दि. 13) सायंकाळी उशिरा गारपीट व वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक गावांतील घरांचे, वाड्यांचे खूप नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली तसेच विजेचे खांब कोसळले. सुदैवाने कोणत्याही जीवितहानीची नोंद नाही.

मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीत सुधागड तालुक्यात तोरणगाव, आवंढे, भैरव या गावात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तेथील घरांचे पत्रे उडाले, भिंती कोसळल्या, विजेचे खांब पडले, गुरांचे वाडे कोलमडले. मोटार व मोटारसायकलींचेदेखील नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कवेले, पेडली व जांभूळपाडा विभाग व इतर गावातदेखील मोठे नुकसान झाले आहे. तसेच पाच – सहा विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी दिली. तालुक्यातील आणखी काही गावांमध्ये नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही माहिती पंचनामे झाल्यावर समोर येईल.

तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी मंगळवारी रात्रीच सर्वाधिक नुकसान झालेल्या गावांना भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी केली व ग्रामस्थांबरोबर संवाद साधला.

सुधागड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी केली. सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जात आहेत. खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणसोबत बैठक घेतली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून दुपारी किंवा सांयकाळी वीज पुरवठा सुरळीत होईल.

-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply