पनवेल : वार्ताहर
पनवेल प्रभाग 18मधील लोखंडी पाडा येथील श्री सहयोग सोसायटीची समस्या मार्गी लावण्यात नगरसेवक विक्रांत पाटील यांना यश आले आहे. सोसायटीच्या आवारातून महानगरपालिकेचे अरुंद आणि कमी खोलीचे गटार असल्याकारणाने सांडपाणी वाहत नव्हते. हे छोटे गटार मुख्य नाल्याला जोडले गेले आहेत, परंतु मुख्य नाल्यात कचरा आणि माती पडून पाणी जाण्याचा मार्ग अडला होता. या मुख्य नाल्यातून सांडपाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे छोट्या गटारामधील पाणी उलट फिरून साचून गेले होते. सांडपाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. यामुळे डासांचा प्रार्दुभावही वाढला होता. विशेष करून तळमजल्याच्या लोकांना याचा जास्त त्रास जाणवत होता. या विषयावरून श्री सहयोग सोसायटीच्या रहिवाशांनी प्रभाग 18 चे कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांची भेट घेत या विषयाची माहिती दिली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्राधान्य देणारे महापौर विक्रांत पाटील यांनी त्वरित साचलेल्या सांडपाण्यावर फवारणी करून घेतली. महानगरपालिका अधिकार्यांशी याविषयी चर्चा केली. तसेच तातडीने सफाई करून घेण्यासाठी पत्र दिले. महानगरपालिका कर्मचार्यांनी मुख्य नाल्यातील माती आणि कचरा साफ करून घेतला. पाण्याचा प्रवाह मोकळा झाला. याच बरोबर छोट्या गटारातील गाळ काढून घेण्यात आला. मुख्य नाल्याची सफाई केल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ लागला. तुंबलेले पाणी ओसरले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी विक्रांत पाटील हे अग्रेसर राहतात.