Breaking News

महाराष्ट्राची उपांत्य फेरीत धडक

वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

मुंबई ः प्रतिनिधी

महाराष्ट्रने 5-5 चढायांच्या उत्कंठावर्धक लढतीत यजमान उत्तर प्रदेशला 38-37(7-6) असे चकवित 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणार्‍या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत सेनादलाशी, तर गतविजेत्या रेल्वेची लढत राजस्थानशी होईल.

उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय बंदिस्त क्रीडा संकुलात मॅटवर झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राच्या अमीर कदमने प्रो-स्टार राहुल चौधरीची पहिल्याच चढाईत पकड करीत गुणांचे खाते उघडले. त्याला तोडीस तोड उत्तर देत यूपीने रिशांक इरनाकची पकड करीत बरोबरी साधली. हा सिलसिला काही वेळ चालला, पण काही वेळातच यूपीने गिअर बदलला व 12व्या मिनिटाला महाराष्ट्रावर लोण देत 11-05अशी आघाडी घेतली. याने खचून न जाता महाराष्ट्राने आपल्या खेळाची गती वाढवित पटापट गुण घेत यूपीवर लोण देत आणला, पण शिलकी तीन खेळाडूंत झालेल्या सिद्धार्थच्या पकडीने महाराष्ट्राच्या इराद्यावर पाणी फेरले. त्यातच पंकज मोहिते जायबंदी झाल्याने उर्वरित सामन्यात खेळू शकला नाही. यूपीवर होणारा लोण महाराष्ट्राने आपल्यावर ओढवून घेतला. या पूर्वार्धातील दोन लोणमुळे यूपीने 22-14 अशी आघाडी घेतली. मध्यांतरालाच यूपीकडे 22-16 अशी आघाडी होती.

यातून महाराष्ट्राने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. पंकजच्या बदली पुन्हा अजिंक्य पवारला संधी मिळाली. त्याने आणि सिद्धार्थ देसाईने चढाईत, तर गिरीश इरनाक, अमीर कदम यांनी पकडीत गुण घेत यूपीवर पहिला लोण देत 24- 24 अशी बरोबरी साधली. येथून मग तिसर्‍या चढाईचा खेळ सुरू झाला. त्यामुळे शेवटी 31-31 या समान गुणफलकावर संपूर्ण डाव संपला.

बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी मग नियमाप्रमाणे 5-5 चढायांचा डाव खेळवण्यात आला. या डावात महाराष्ट्राने एक बदल केला. डावा मधरक्षक सुधाकर कदमऐवजी चढाईच्या निलेश साळुंखेला संधी देण्यात आली. त्याने या संधीचे सोने केले. त्याने या डावातील आपल्या चढाईत बोनस व गडी टिपत दोन गुण घेतले व महाराष्ट्राच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर गिरीशने राहुल चौधरीची पकड करीत विजयाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले. शेवटी एक एक गुण देत घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यूपीच्या अभिषेक सिंगने चढाईत गुण वसूल करीत संघाच्या विजयाचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याला नितीन तोमर, राहुल चौधरीकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. या दोघांनी गिरीशचा धसका घेतला होता. अमीर कदमने या डावात मध्यरक्षकांच्या दोन्ही बाजूंची भूमिका बजावत हम भी कूच कम नाही हे दाखवून दिले.

इतर सामन्यांत भारतीय रेल्वेने चंदीगडला 34-30,  राजस्थानने कर्नाटकला 58-33, तर सेनादलाने हिमाचल प्रदेशाला 45-18 असा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply