Breaking News

व्हेंडर न मिळाल्याने सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी निधी गेला परत

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेला निधी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तो परत मिळविण्यासाठी पंचायत समिती उरण प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. परंतू संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या योजनेपासून उरण तालुका मात्र वंचितच राहिला आहे.

उरण पंचायत समितीचा 29 लाख सहा हजार 1475 रुपयांचा निधी 31 मार्चपर्यंत खर्च न झाल्याने जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग रायगड जिल्हा परिषदेने या निधी खात्यावर वर्ग केले. या निधीमध्ये 2,38,000 रुपये हे भारत सरकारने उरण तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींना प्रती ग्रामपंचायत एक सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन खरेदी करण्यासाठी दिली होती, परंतु प्रती ग्रामपंचायत सात हजार प्रमाणे ही मशीन देण्यास उरण पंचायत समिती प्रशासनास कोणीही व्हेंडर मिळाला नाही.

परंतू त्याच वेळी जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये मात्र या मशिन्स बसविल्या जात होत्या. रायगड जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांतील ग्रामपंचायतींना या मशीन्स बसविल्या गेल्या. पण उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींना मात्र आर्थिक वर्ष संपले असतांनाही  या मशीन्स बसविल्या गेल्या नाहीत. शेवटी या मशीन्ससाठी आलेला निधी जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग रायगड जिल्हा परिषदेच्या खात्यावर परत वर्ग झाला आहे.

निधी परत मिळावा म्हणून उरणच्या गटविकास अधिकारी निलिमा गाडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग रायगड जिल्हा परिषद आलिबाग यांना 6 जुलै 2020 रोजी पत्रव्यवहार केला आहे, परंतु अजुनही हा निधी मात्र उरण पंचायत समितीला परत मिळाला नाही. त्यामूळे महिलांसाठी केंद्रसरकार राबवत असलेली योजना संपूर्ण रायगड जिल्ह्यात फक्त उरण तालुक्यातच राबविली गेली नाही.

आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी जमा झाला होता, परंतु त्या रकमेत सॅनिटरी नॅपकीन डिस्ट्रॉयर मशीन द्यायला कोणीही व्हेंडर तयार नव्हता. त्यामुळे मशीन्स खरेदी करता आल्या नाहीत, परंतु आर्थिक वर्ष संपताच ती रक्कम परत गेली. आता मशीन देणारे व्हेंडर मिळाल्यामुळे निधी परत मागविला आहे.

-निलिमा गाडे, गटविकास अधिकारी, उरण

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply