खोपोली ः प्रतिनिधी
खोपोलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शुक्रवारी (दि. 16) नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात सर्वपक्षीय नेतेमंडळी, सामाजिक संघटना, व्यापारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सर्वानुमते आठवड्यातून तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवार ते सोमवार दवाखाने, औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार पूर्णतः बंद राहणार आहेत.
गेले काही दिवस खोपोली शहर व परिसरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच रुग्णांना बेड, औषधे मिळविण्यात नातेवाइकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, गेल्या दोन दिवसांत शहरातील काही दिग्गजांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, व्यापारी प्रतिनिधी यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आठवड्यातून तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात दुध केवळ सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत मिळेल.
या बैठकीला नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे, भाजपचे इंदरमल खंडेलवाल, ईश्वर शिंपी, शिवसेना शहर प्रमुख व गटनेते सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर, ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल, किशोर पानसरे, गटनेते मंगेश दळवी, जिल्हा समन्वय समिती सदस्य नवीन घाटवळ शासकीय वकील राजेंद्र येरुणकर, एकनाथ पिंगळे तात्या रिटे, व्यापारी संघटनेचे कांतीलाल पोरवाल, सुभाष पोरवाल, राजू आभानी, राजेंद्र फके, रिपाइंचे नरेंद्र गायकवाड यांच्यासह मार्केट असोसिएशन व रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …