Breaking News

राज्यातील कोरोनाबळी हे तर उद्धव ठाकरेंचे पाप

खासदार नारायण राणेंचा घणाघात

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू लागले आहेत. 59 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे, राज्य सरकारचे पाप आहे. मुख्यमंत्री फक्त बाधितांचे आणि मृतांचे आकडे जाहीर करतात. हे नाही-ते नाही सांगतात. जनाची नाही, तर मनाची तरी आहे का मुख्यमंत्र्यांना? अशा शब्दांत भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते
राणे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय, या मुंबईत फक्त सव्वा लाख भिकारी आहेत. जरा आकडा मोजून घ्या. रस्त्यावर लोकंच नसतील तर भीक कुठून मिळणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे बघत आहेत. उद्या यांना दोन वेळचे जेवण लागले तरी केंद्राकडे मागतील. राज्य चालवण्यासाठी पैसा जमा करण्याचे काम घटनेने राज्य सरकारला दिले आहे. जरा राज्यघटना वाचा. नुसते मातोश्रीच्या पिंजर्‍यात बसून काय करताय? एक-दोन दिवसांत मुंबईत हॉस्पिटल उभे करू शकत नाही? मुंबईत हवे ते करू शकतो माणूस. कमी असेल तर ते उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री असतो. नुसते खुर्चीवर बसून चालत नाही. त्याला कर्तृत्व लागते, मात्र राज्य आर्थिक संकटात टाकायचे काम सुरू आहे.
देशात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 41 टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत. उपाय म्हणून मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्याची वारंवार धमकी देत होते. जणू महाराष्ट्र राज्य त्यांनी विकत घेतलाय. शेवटी त्यांनी कडक निर्बंध लागू केले. म्हणे रिक्षावाल्यांना 1500 देणार, पण पाच माणसांचे कुटूंब 1500 रुपयांमध्ये उपजीविका करू शकणार आहे का, असा सवाल करीत राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंना फटकारले.
अनेक सचिन वाझे कार्यरत
या वेळी बोलताना खासदार नारायण राणेंनी सचिन वाझे प्रकरणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला. सचिन वाझे प्रकरण एक आहे, पण नजरेसमोर न आलेले अजून किती सचिन वाझे आहेत जे यांच्या आदेशांनुसार चालत आहेत. यांना नको असलेली माणसे सचिन वाझेंसारख्या लोकांकडून मारण्याचे काम अजूनही सुरू आहे. एनआयएच्या चौकशीतून अजून बाहेर येईल. वाझे कुणाच्या सांगण्यावरून कुणाकुणाची अजून हत्या करणार होते ते बाहेर येईल. भयावह चालू आहे. हे लोकशाहीतील राज्य नसून ही हुकूमशाही सुरू आहे. फक्त पैसा कमावण्यासाठी एककलमी कार्यक्रम चालू आहे, असे ते म्हणाले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply