Breaking News

खालापुरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; चौकचे सुधीर ठोंबरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यात मोठा राजकीय भूकंप घडला असून चौक जिल्हा परिषद गटातील ताकदवान नेते सुधीर ठोंबरे यांनी सोमवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई येथील कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठोंबरे यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
चौक जिल्हा परिषद गटावर सुधीर ठोंबरे यांचे 20 वर्षांपासून वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या चौक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ठोंबरे यांनी सत्ता मिळवताना मुलगी रितू हिला थेट सरपंचपदी निवडून आणले होते. त्यांचा वैयक्तिक करिष्मा परिसरात असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाला खालापुरात खिंडार पडले आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, माजी नगरसेवक हरेश केणी, नितीन पाटील, अनिल भगत, बबन मुकादम, तुपगावचे सरपंच रवी कुंभार, गणेश कदम, रामदास साळवी, विभागप्रमुख गणेश मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी सुधीर ठोंबरे यांच्यासह लोधिवली ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन मेश्राम, सदानंद हंबीर, राजेश भोनगे, शांताराम तेवरे, व्यकंट सुरवसे आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी पक्षात स्वागत केले.

चौक भागातील विकासकामे मार्गी लागण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात अनेक लोकोपयोगी कामे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू.
-सुधीर ठोंबरे, चौक

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply