पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आताच्या परिस्थितीमध्ये कुणाला जबाबदार धरण्याची वेळ नाही. सर्वांनी खबरदारी घेण्याची वेळ आहे. सर्व नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या उपाय योजना आपल्या पातळीवर राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. दुसर्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या पनवेल महापालिका क्षेत्रात वाढत आहेत. पालिका आणि पोलीस यंत्रणेला प्रत्येक घरांमध्ये जाऊन शिस्त लावणे शक्य् नाही. आताच्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ‘मी जबाबदार‘ असे सांगितले आहे. नागरिकांनी स्वत:ची आणि स्वत:च्या कुटूंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. ही जबाबदारी पार पाडण्याची खूणगाठ सर्वांनी बांधण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणासाठी पालिका आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांसाठी योजना राबवल्या जात आहेत. यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी सक्रिय आणि सकारात्मक होऊन सहभागी व्हायला पाहिजे, असे ते म्हणाले. महानगरपालिकने टेस्टींगचे प्रमाण वाढवले असून रोज 2000 ते 2500 टेस्ट केल्या जात आहे. यासाठी पालिकेने 10 फिरत्या टेस्टींग टिम तयार केल्या असून कॉल सेंटरच्या माध्यमातून ट्रेसिंगवर भर देण्यात येत आहे. कळंबोली येथील कोविड सेंटर बरोबरच उपजिल्हा रूग्णालय तसेच 33 खाजगी रुग्णालये उपलब्ध करून दिली असून, खारघर येथील आयुष मंत्रालयाची इमारत कोविडसाठी राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच रेमडेसिवीरच्या 5000 वायल (इंन्जेक्शन डोस) मिळवण्यासाठी पालिकेने शासनाकडे मागणी पत्र पाठवले आहे. पालिका हद्दीत लसीकरण वाढवले असून सध्या शासकीय आठ आणि खाजगी 12 अशी 20 लसीकरण केंद्रे चालू आहेत. लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शासकिय नियमाप्रमाणे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असेही आयुक्त म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानाबाहेर वर्तुळे आखावीत. अत्याश्यक सेवा देणार्यां आस्थापनांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन राखणे गरजेचे आहे, असे आवाहन आयुक्तांनी केले.