Breaking News

कोरोनामुळे घाबरू नका आणि निष्काळजीपणाही करू नका!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे वेगळी आणि गंभीर आहे, मात्र घाबरू नका आणि निष्काळजीपणाही करू नका, असे आवाहन  भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेला व शासनाला केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, आरोग्य व्यवस्था, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना होणारा त्रास, मदत, उपाययोजना, लसीकरण जनजागृती आदी विविध मुद्द्यांवर त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधून दिलासा दिला.
नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे उपचार घेणार्‍या 24 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्यांच्या परिजनांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांच्या परिवारासोबत संवेदना आहेत. गेलेला जीव परत येत नसतो, पण ही बाब मनाला खूप वेदनादायी घटना आहे, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी शोक व्यक्त केला, तसेच अशा घटना घडू नये यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, आज आपल्या अवतीभोवती पाहिले तर कोविडमुळे अनेक लोकांची अवस्था गंभीर झाली आहे. रोजच्या रोज आपण पाहतो की, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकं रुग्णांच्या उपचारार्थ प्रयत्न करूनसुद्धा काही लोकांना मदत करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेड हवा आहे, त्यासाठी पहिली धावपळ आणि अ‍ॅडमिट झाल्यानंतर रेमडीसीवीर इंजेक्शन, औषधोपचारासाठी पाठपुरावा. ही सगळी परिस्थिती आपल्या सर्वांवर आली आहे. प्रचंड चिंतेचे वातावरण सभोवती पहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण आहे. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, महापालिका, जिल्हा प्रशासन, केंद्र, राज्य सरकार करतेय काय, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपण एकमेकांना विचारतो. रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि परिसरात आता दरदिवशी 800 कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. उरण, पेण, अलिबागसारख्या परिसरातही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सद्यस्थितीत पनवेल परिसरातील विविध रुग्णालयांत कोरोनाचे सहा हजार रुग्ण दाखल आहेत. या सर्व परिस्थितीत नव्या रुग्णांना बेड्स मिळत नाही. पनवेलमधील तिर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात 150 बेडची क्षमता आहे, पण तेथेही 160पेक्षा जास्त रुग्ण दाखल आहेत. तेथील डॉ. बसवराज लोहारे व त्यांचे सहकारी मेहनतीने लोकांना सेवा देण्याचे काम करीत आहेत. महापालिकेने सिडकोच्या माध्यमातून कळंबोली येथे उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये 72 बेडची क्षमता आहे, पण तेही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. महापालिकेने खासगी 34, तर ग्रामीण भागात तहसीलदारांनी 12 रुग्णालयांना कोविड उपचाराची मान्यता दिली आहे. असे असतानाही बेड मिळत नाही हा आपल्या सर्वांचा मोठा प्रश्न आहे. अशा वेळी महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पावले उचलली पाहिजेत ही सर्वांची भावना आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून तसे प्रयत्न होत आहेत. मी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आम्ही प्रयत्न करीत आहोत. महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सहकारीही प्रयत्न करीत आहेत.
एमजीएम हॉस्पिटलमधील 250 बेड महात्मा फुले आरोग्य योजनेत वापरले जात आहेत. आणखी 200 बेडसाठीचा करार महापालिकेमार्फत केला जाणार आहेत. आधी 100 बेड व त्यानंतर 100 बेडचा टप्पा केला जाणार आहे. येत्या आठवड्यात कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या संदर्भातील आपला पाठपुरावा सुरु आहे. पनवेलमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. त्या अनुषंगाने आता महापालिकेच्या माध्यमातून ही मागणी पुढे गेली व मान्य झाली आणि आता 800 बेडच्या कोविड सेंटरसाठी कळंबोलीजवळील सीसीआय गोडाऊनचा ताबा घेण्यात आला आहे. तेथे काम सुरू होणार असून, सिडकोच्या माध्यमातून त्यासाठी निधी दिला जावा असे आदेश शासनाने दिले आहेत. 800 बेड असल्याने कार्यान्वित व्हायला वेळ जाणार आहे, पण लवकरच त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत सर्वच चिंतेत आहेत. एक आठवड्यापूर्वी शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे.  डॉक्टर रुग्णांच्या उपचारासाठी या इंजेक्शनची मागणी करतात, पण हे इंजेक्शन सहज उपलब्ध होत नसल्याने त्याचा काळाबाजार होत असल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. किमान कोविड रुग्णांसाठी तरी शासनाने त्या-त्या हॉस्पिटलला योग्य प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा केला पाहिजे. त्यामुळे ते सहजपणे उपलब्ध होऊन त्याचा काळाबाजार होणार नाही. या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांशी माझा सतत पाठपुरावा सुरू आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
आताचा कोरोना स्ट्रेन पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे रुग्ण दाखल झाल्यावर डॉक्टर रेमडेसिवीर इंजेक्शन सूचवितात आणि त्याचे प्रिस्क्रिप्शन घेऊन रुग्णांचे नातेवाईक पनवेल, नवी मुंबई, मुंबई, पुणे या ठिकाणी सैरावैरा फिरत असतात. यामध्ये रुग्ण आणि नातेवाइकांना फार मोठा त्रास होत असल्याने या संदर्भात शासनाने लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे. आजच्या घडीला दररोज कोविडची घटना पाहता शासनाच्या माध्यमातून आम्हाला काय मिळतेय की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. या संदर्भात गेल्या सहा महिन्यांतील व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून आहे ती ठेवण्यात आली असती तर आज इतक्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागले नसते. मागील वर्षाच्या तुलनेत आताचा कोविड स्ट्रेन वेगळा आणि गंभीर स्वरूपाचा आहे. असे असले तरी घाबरू नका, मात्र कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्या संबंधी सर्व नियमांचे पालन करा, अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. कोरोनाचा तरुणांमध्ये झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे लागण होऊ नये याची काळजी घ्या. यापुढे रुग्णसंख्या वाढत राहिली तर शासनाला लॉकडाऊनचाच पर्याय राहिल आणि ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे लॉकडाऊनमुळे अतोनात हाल होतील. ते लक्षात घेता नियमांचे पालन करा, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.
सध्या 70 टक्के बाजरपेठ बंद आहे तरीही रुग्णांची संख्या वाढतच आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. हा उपाय नाही तर प्रसार रोखण्यासाठीचे पाऊल आहे. या पार्श्वभूमीवर सक्षम उपाययोजना झाली पाहिजे. गेल्या वर्षी विविध संघटनांनी पुढे येऊन आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला. त्याचप्रमाणे या काळातही तरुणांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन हातावर पोट असलेल्यांना मदत करावी, तसेच सोसायटी, गल्ली, गाव, अशा विविध ठिकाणी तरुणांनी कमिटी तयार करून आपल्या परिसरात विनामास्क कुणी फिरणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केेले.
चौकट
एकमेकांना सहकार्य करा!
नागरिकांना या कठीण काळात भाजपचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अखंडपणे मदतीचे काम केले. कोणालाही मदतीची गरज लागल्यास आमचे शहरातील पक्ष कार्यालये आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाधिकारी आहेत. त्यांच्याशी संपर्क करावा किंवा माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले. नागरिकांच्या हितासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. सुरुवातीला गरीब कल्याण योजना, नंतर आत्मनिर्भर योजना असे पॅकेज देण्याबरोबरच देशात लसींचे उत्पादन सुरू केले, तसेच परदेशातील लसींना मान्यता देण्यात आली आहे. तरुणांना लस देण्याची मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येकाला आपले कुटुंब प्रिय आहे. पुन्हा आलेले हे छोटे संकट नाही. निष्काळजीपणा महागात पडेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. एकमेकांना मदत करीत हे संकट दूर करण्याचे सामर्थ्य प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे, असेही त्यांनी आपल्या संवादात नमूद केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट …

Leave a Reply