Breaking News

पनवेल महापालिकेचा एमजीएम रुग्णालयासोबत करार

200 आयसीयू बेड मिळणार; दररोज 300 कोरोना टेस्टही होणार

पनवेल ः प्रतिनिधी
कामोठे एमजीएम रुग्णालय आणि पनवेल महानगरपालिका यांच्यात कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त मोफत वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने 200 आयसीयू बेड आणि दररोज 300 आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचा करार गुरुवारी (दि. 22) करण्यात आला. सध्या एमजीएम रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 250 बेडची सुविधा उपलब्ध असून, नवीन करारामुळे आणखी 200 आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पनवेल महापालिकेने 20 एप्रिलच्या महासभेत घेतलेल्या निर्णयानुसार 200 आयसीयू बेड 1 मेपासून टप्प्याटप्प्याने एमजीएम रुग्णालयाकडून महापालिकेला प्राप्त होतील. त्याचप्रमाणे पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या दररोज 500 आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयात, तर 200 चाचण्या अलिबाग येथील प्रयोगशाळेत केल्या जात जात आहेत. ही सुविधा अपुरी पडू लागल्याने प्रतिदिन 300 नागरिकांच्या मोफत आरटी-पीसीआर चाचण्या एमजीएम रुग्णालयामार्फत होण्याकरितासुद्धा या वेळी करार करण्यात आला.
दरम्यान, पनवेल परिसरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन शासनाने 800 बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर सिडकोच्या मदतीने उभे करण्याकरिता मान्यता दिली असून, कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमध्ये कळंबोली येथे 200 आयसीयू बेड व 600 ऑक्सिजन बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत महापालिकेला एमजीएमकडील 200 आयसीयू बेड व जम्बो फॅसिलिटीतील 800 बेड असे एकूण एक हजार बेड कोरोना उपचारासाठी उपलब्ध होतील. याशिवाय एमजीएममध्ये 250 बेड महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत पनवेलकरांसाठी मोफत उपलब्ध राहतील.
एमजीएम हॉस्पिटलसोबत करारनामा करतेवेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त सुधाकर देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, उपायुक्त संजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, एमजीएम रुग्णालयाचे ट्रस्टी सुधीर कदम, डीन नरशेट्टी, सलगोत्रा उपस्थित होते.
तेरणा मेडिकल कॉलेजकडूनदेखील 300 आरटी-पीसीआर टेस्ट होणार
तेरणा मेडिकल कॉलेजकडूनदेखील कोरोनाच्या दररोज 300 आरटीपीसीआर टेस्ट होण्याकरिता करारनामा करण्यात आला. त्यासोबतच आवश्यकतेप्रमाणे अ‍ॅण्टीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त मोफत टेस्ट उपलब्ध करून देण्याकरिता पनवेल महापालिका प्रयत्न करीत असून, एमजीएम हॉस्पिटल आणि तेरणा मेडिकल कॉलेज यांच्यासोबत प्रत्येकी 300 आरटी-पीसीआर टेस्टसाठी करारनामा केल्यामुळे पनवेलमधील नागरिकांना शुक्रवारपासून एकूण दररोज 1300 आरटी-पीसीआर टेस्ट मोफत करून मिळणार आहेत.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply