पनवेल ः बातमीदार
येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला आहे. डॉक्टर दिनानिमित्त पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या 20 डॉक्टरांनी नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला असून येत्या काळात नेत्रदान वाढविण्याची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये जनजागृती करणार आहेत.
एखादी व्यक्ती स्वतःच्या हयातीतच नेत्रदानाचा संकल्प करू शकते किंवा त्या व्यक्तीच्या निधनानंतर तिचे जवळचे नातेवाईक नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात हा संदेश या डॉक्टर दिनानिमित्त देण्यात आला. प्रत्येक नेत्रपेढीकडे बुबूळ रोपणाची गरज असणार्यांची यादी तयार असते. यादीतील क्रमांकानुसार त्या व्यक्तींच्या डोळ्यांवर बुबूळ रोपण केले जाते. एका व्यक्तीने दान केलेल्या डोळ्यांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते, पण अंध व्यक्तींच्या संख्येच्या मानाने नेत्रदान करणार्यांची संख्या फारच कमी असल्याने बुबूळ रोपणाची प्रतीक्षा यादी महाराष्ट्रात वाढतच चालली आहे. कॉर्निया शल्यचिकित्सक डॉ. भूपेश जैन, ज्येष्ठग्लुकोमा शल्यविशारद डॉ. विजय शेट्टी, मोतीबिंदू विभागाच्या उपसंचालिका डॉ. सुधा सीतारामन, डॉ. रवीश वैष्णव, डॉ. ध्रुवेन, डॉ. अस्मा, डॉ. प्रियंका, डॉ. हर्षा व डॉ. आदिल यांनी या नेत्रदानाच्या संकल्पासाठी पुढाकार घेतला.