पनवेल ग्रामीण पोलिसांकडून दंड वसुली
पनवेल : रामप्रहर वृत्त
खारपाडा चेकपोस्टवर पनवेल ग्रामीण पोलिसांकडून कडक निर्बंधांचे नियम तोडणार्यांकडून आर्थिक दंड वसुलीसह गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. निर्बंध तोडणार्यांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून येथील कळंबोली, पळस्पे फाटा, खारपाडा टोल नाका येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नियम तोडणार्यावर कडक कारवाई केली जात आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारपाडा टोल नाका येथेही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात असून संचारबंदीकाळात विनाकारण फिरणार्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या प्रवाशी तसेच वाहन चालकांवर भा. दं. वि. कलम 188 आणि मोटार वाहन कायद्यांन्वयेही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
मागील काही दिवसांत सुमारे 35 हजार रुपये दंड स्वरूपात वसूल केला असून सुमारे 44 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे खारपाडा टोलनाका येथील चेकपोस्टवर तैनात असलेले पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत पाटील यांनी सांगितले.
या वेळी त्यांच्यासोबत पोलीस नाईक जगदीश पाटील, कॉन्स्टेबल अस्मिता पाटील, नितीन डगळे, वाहतूक शाखा हवालदार गावंड व कॉन्स्टेबल खोटरे कार्यरत असल्याचेही भरत पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper