Breaking News

सीकेटी कॉलेजमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर आर्टस्‌‍‍, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (अधिकारप्रदात्त स्वायत्त) येथे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन सोमवारी (दि.30) करण्यात आले होते.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून लखनऊ विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. एस.बी. निमसे यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, ॲड. राहुल घरत, प्राचार्य डॉ.एस.के. पाटील आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांचे प्रमुख तसेच विविध विभागांचे प्रमुख मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना तसेच पीएचडीप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. एस.बी. निमसे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, भारताला विश्वगुरू बनण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि कौशल्याधारित ज्ञानाची आवश्यकता आहे. भविष्याचा विचार करता कसदार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि परदेशातून भारताकडे शिक्षणासाठी अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बौद्धिक कुतूहल, महत्त्वाकांक्षा आणि आपण निवडलेल्या क्षेत्राबद्दल सार्थ अभिमान हे तीन गुण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यात यशस्वी झाल्यानंतरदेखील आपल्या महाविद्यालयाप्रती सर्व विद्यार्थ्यांनी कृतज्ञ राहावे. डॉ. निमसे यांनी महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक प्रमाण मुलींचे असल्याबद्दल कौतुक केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, इच्छाशक्ती असेल तर संघर्ष करण्याची ताकद आपल्या पायात आपोआप येते. त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाचे यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर या महाविद्यालयातून पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ.एस.के. पाटील यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण कक्षाचे समन्वयक डॉ.एस.एन. परकाळे यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ. गीतिका तंवर, प्रा.ए.व्ही. पाटील आणि प्रा.एन.एच. कडू यांनी केले, तर उपस्थितांचे आभार परीक्षा नियंत्रक डॉ.एस.आय. उन्हाळे यांनी मानले.
कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा नियंत्रक डॉ.उन्हाळे, विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण कक्षाचे समन्वयक डॉ.परकाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.बी.डी. आघाव यांनी परिश्रम घेतले. त्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेे सहकार्य लाभले.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply