दुबई ः वृत्तसंस्था
आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये टी-20 वर्ल्डकप आणि काही द्विपक्षीय मालिकादेखील होणार आहेत. यूएईमधील तीन पीचवर हे सर्व सामने झाल्यास शेवटच्या टप्प्यात पीच स्लो होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार हे टाळण्यासाठी टी-20 वर्ल्डकपचे काही सामने यूएईसह ओमानमध्ये घेण्याची आयसीसीची योजना आहे.
आयपीएलचे 31 आणि टी-20 वर्ल्डकपचे पात्रता फेरीसह 45 सामने यूएईमधील तीन पीचवर खेळविणे सोपे जाणार नाही. मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये 60 सामने यूएईत झाले होते. यंदा ही संख्या 16ने जास्त आहे. याविषयी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार टी-20 वर्ल्डकप यूएईमध्ये झाला, तर स्पर्धेतील सुरुवातीचे सामने ओमानमध्ये होण्याची शक्यता आहे. अर्थात यासाठी यूएई सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडू क्वारंटाइन न राहता दोन्ही देशांमध्ये प्रवास करू शकतील. यूएई सरकारने प्रत्येक देशासाठी क्वारंटाइनचे वेगवेगळे नियम बनविले आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपसाठी सप्टेंबरच्या शेवटच्या महिन्यापासून टीम यूएईमध्ये येण्यास सुरुवात होईल.
वेस्ट इंडिजचे खेळाडू उशिरा होणार सहभागी
आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र कॅरेबियन प्रीमियर लीगच्या या सीझनची फायनल 19 सप्टेंबरला आहे. त्यामुळे मुंबईचा कायरन पोलार्ड, केकेआरचा आंद्रे रसेल, सुनील नरीन, पंजाबचा निकोलस पूरन, ख्रिस गेल यांच्यासह अनेक बडे खेळाडू सुरुवातीच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. वेस्ट इंडिजमधून येणार्या या खेळाडूंना यूएईमध्ये क्वारंटाइनदेखील राहावे लागणार आहे.