
पनवेल ः वार्ताहर
शिवसेना, भाजप, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे यांचा
पनवेलमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदाराशी संवाद साधून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. यानिमित्ताने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा झंझावात पनवेलकरांना पाहायला मिळाला. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19मध्ये सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 15) प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेलमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे मावळ
मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराने जोर धरला आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19मध्ये त्यांच्या प्रचार रॅलीचेे आयोजन करण्यात आले होते. शहरातील तवा हॉटेलजवळून प्रचार रॅलीस सुरुवात होऊन पंचरत्न हॉटेलजवळ सांगता झाली. प्रचारादरम्यान भाजप-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, संजय जैन, युवा नेते पवन सोनी, अच्युत मनोरे, राजेंद्र सारवरे, महिला मोर्चाच्या सपना पाटील यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.