पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले आहे. राज्य सरकारला गर्भित इशारा देण्याच्या उद्देशाने मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होणार्या कार्यकर्त्यांना तोंडाला लावण्यासाठी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या वतीने ‘दिबा स्पेशल मास्क’ बनविण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना संदीप पाटील म्हणाले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे स्थान प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या हृदयामध्ये आहे.त्यामुळे विमानतळाला त्यांचेच नाव दिले पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु आंदोलन करीत असताना अजूनही कोरोना विषाणूचे संकट गेलेले नाही. म्हणून मी कार्यकर्त्यांना मास्कचे वाटप करणार आहे. अर्थातच दि. बा. पाटील यांच्या नावाच्या मागणीसाठी हे आंदोलन असल्याने मास्कवर त्यांची प्रतिमा छापली आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की त्यांनी आंदोलनात सहभागी होताना कोरोना प्रतिबंधक तमाम निर्बंध आणि निकष यांचे तंतोतंत पालन करावे.