पेण ः प्रतिनिधी
गणेशोत्सव जवळ येऊ लागल्याने गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या पेणमधील कार्यशाळांत लगबग वाढली आहे. पेणच्या गणेशमूर्तींना देश-विदेशात मागणी असून आतापर्यंत चार लाख गणेशमूर्ती परदेशांत रवाना झाल्या असल्याची माहिती येथील गणेशमूर्तीकार दीपक समेळ यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे सार्वजनिक आणि घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पेणमधून लाखो गणेशमूर्ती विविध शहरांतील बाजारपेठेत रवाना होऊ लागल्या आहेत. व्यापार्यांनी येथून गणेशमूर्ती घेऊन जाण्यास प्रारंभ केला आहे, तर चार लाख गणेशमूर्ती जेएनपीटी बंदरातून बोटीने अमेरिका, फ्रान्स, मलेशिया व काही आखाती देशांत रवाना झाल्या आहेत. पेण शहर व परिसरात यंदा 35 ते 40 लाख गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीमुळे वाहतूक निर्बंध, बाजारपेठा बंद यामुळे नेहमीचे व्यापारी आणि स्थानिक खरेदीदार यांचा अंदाज घेऊन मूर्ती घडविण्यात आल्या आहेत, असे मूर्तीकार समेळ यांनी सांगितले. कोरोनामुळे गेल्या वर्षी गणेशमूर्तिकारांचे नुकसान झाले. मूर्तिकारांनी बँकेकडून घेतलेली कर्जे थकली आहेत. याबाबत राज्य शासनाने विचार करून आर्थिक मदत करावी, अशी मूर्तिकारांची मागणी आहे.