अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सोमवार (दि. 11)पर्यंत 316 जणांना कोरोनाची लागण झाली असून, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 103 रुग्णांनी कोरोनावर मात करून जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. बरे झालेल्यांना रुग्णालयातून बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी एक हजार 543 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी तपासणीअंती एक हजार 197 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 103 रुग्णांनी कोरोनाला हरविले, तर दुर्देवाने 10 जणांचे जगण्याचे प्रयत्न असफल झाले. सद्यस्थितीत 203 कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती उत्तम असून, तेही लवकरच पूर्ण बरे होऊन आपआपल्या घरी परततील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मोरा येथील बर्या झालेल्या पोलिसावर पुष्पवृष्टी
उरण : मोरा येथे वास्तव्यास असलेल्या आणि मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या शिपायाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली. घरी परतलेल्या या कोविड योद्ध्याचे सोमवारी (दि. 11) शासकीय कर्मचारी तसेच रहिवाशांनी फुलांची उधळण करीत जोरदार स्वागत केले.
पोलीस शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याची पत्नी व पत्नीनंतर 11 वर्षांच्या मुलीलाही संसर्ग झाला. त्यांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पोलीस शिपाई बरा झाला असून, त्याला सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला, तर मायलेकींची तब्येतही उत्तम असून, त्यांनाही येत्या दोन दिवसांत डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली. उरण तालुक्यातील आतापर्यंत पाच कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …