Breaking News

वरंडोली येथील मोरीचे पिलर्स ढासळले; महाड-रायगड मार्ग बंद पडण्याची शक्यता

महाड : प्रतिनिधी

महाड-रायगड मार्गावर वरंडोली गावानजीक नाल्यावरील मोरीचे पिलर्स ढासळू लागल्याने हा मार्ग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे.  महाड-रायगड मार्गावर वरंडोली ते कोथूर्डे फाटा यादरम्यान एका वळणावरील नाल्यावर असलेल्या मोरीचे पिलर्स पावसामुळे ढासळू लागले आहेत. पिलर्सचे दगड ढासळून खाली पडू लागले आहेत. ही बाब स्थानिक नागरिक सरपंच रामकृष्ण मोरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधितांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, याबाबत महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता माहडकर यांना कळविण्यात आले. त्यांनी तत्काळ दखल घेत पाहणी करून दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले, तसेच तहसीलदार विभागाकडूनदेखील या ठिकाणी पाहणी करण्यात आली. महाड-रायगड मार्गाचे रुंदीकरण गेली तीन वर्षांपासून सुरू आहे. रखडलेल्या कामामुळे हा मार्ग जागोजागी धोकादायक बनला आहे. रस्त्यावर खड्डे आणि झुडपे वाढली आहेत. याबाबत सातत्याने महामार्ग बांधकाम विभागाला कळविण्यात आले, मात्र या विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कोंझर ते किल्ले रायगडदरम्यान रस्त्यावर अनेक झुडपे आली आहेत. शिवाय या ठिकाणीदेखील एका वळणावर संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे आणि मार्गावरील पुलांची पाहणी करणे आवश्यक होते, मात्र या बाबीकडे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात हा मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आला आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply