Breaking News

सुधागडातील पर्यटनबंदी उठवावी स्थानिकांचे तहसीलदारांना निवेदन

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील सुधागड किल्ला, ठाणाळे व नेणवली लेणी येथे पर्यटकांना जाण्यासाठी सुधागड वन विभागाने बंदी घातली आहे. ही बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. सोमवारी (दि. 12) या संदर्भातील निवेदन पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना देण्यात आले. येथील प्राचीन व ऐतिहासिक बौद्ध लेण्या इतिहासाला उजाळा देतात. या लेण्यांचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. येथे सातत्याने स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्यामुळे या ठिकाणी जाण्यास बंदी असू नये, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सुधागड वन परिक्षेत्र अधिकार्‍यांनी नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सुधागड अभयारण्य घोषित करण्यात आल्याने या ठिकाणी भारतीय वन अधिनियम 1927 व भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये प्रवेश करण्यास बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांनी येथे येऊ नये. तसेच वनांना व वन्यजीवांना त्रास होईल असे कृत्य करू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही नमूद केले आहे. परिणामी येथील स्थानिक नागरिक नाराज झाले असून त्यांनी ही बंदी हटविण्यात यावी, असे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की या वास्तू फक्त पर्यटनस्थळे नसून अनेकांच्या अस्मिता आहेत. देशासह परदेशातील नागरिकदेखील येथे येतात. त्यामुळे येथील इतिहासाचा प्रचार व प्रसार होतो. त्यामुळे वन विभागाने ही बंदी उठवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तहसीलदारांना निवेदन देताना राहुल महाडिक, महेश जाधव, सिद्धांत गायकवाड, रवींद्र महाडिक, शेखर तांबट, गजानन वारगुडे, किरण कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply