Breaking News

ग्रामपंचायतींना सतावतोय डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न

मुरुड तालुक्यात 24 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध होत नसल्याने गोळा केलेला कचरा  रस्त्याशेजारी अथवा गावाच्या मागील बाजूस सार्वजनिक ठिकाणी टाकावा लागत आहे. उघड्यावर टाकण्यात येणार्‍या या कचर्‍यामुळे परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. तर डम्पिंग ग्राऊंड नसल्याने कचर्‍याची विल्हेवाट कशी लावावी, हा मोठा प्रश्न या ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाला आहे.

 नगर परिषद व महानगरपालिका यांना शासनाकडून स्वच्छतेसाठी मोठा निधी प्राप्त होत असतो. त्यातुलनेत ग्रामपंचायती मात्र उपेक्षित असतात. मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. तुटपुंज्या उत्पन्नावर त्यांना ग्रामस्थांना विविध सेवा पुरवाव्या लागतात. उत्पन्न कमी असल्याने नागरी सुविधा पुरविताना त्यांची दमछाक होत असते. त्यातच डम्पिंग ग्राऊंड उपलबध नसल्याने कचर्‍याची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुरुड तालुक्यांतील शिघ्रे ग्रुपग्रामपंचायत हद्दीत शिघ्रे, वाणदे, नागशेत, नवीवाडी व आदिवासीवाडी या भागाचा समावेश होतो. या भागातून दररोज सुमारे टनभर कचरा गोळा केला जात असे. मात्र घंटागाडी बंद असल्याने कचर्‍याची मोठी गंभीर समस्या ग्रामस्थांना भेडसावत आहे.

शिघ्रे ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी घंटागाडी गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामस्थ वेशीवरील गटारातच मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात. मुख्य रस्त्यावर साचलेल्या या कचर्‍याने संपुर्ण गावाचेच आरोग्य धोक्यात आणले आहे. घंटागाडी सुरू होण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित होणे अत्यंत महत्वाचे आहे. अन्यथा कचर्‍याचे साम्राज्य नाहिसे होणार नाही. प्रशासनाने तातडीने डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित करण्याचे आदेश देऊन येथील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शिघ्रे ग्रामस्थ करीत आहेत. या संदर्भात शिघ्रेचे सरपंच संतोष पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, चौदाव्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायतीने डिसेंबर 2020 मध्ये घंटागाडी खरेदी केली. पूर्वी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत कचर्‍याची विल्हेवाट केली जात असे. परंतु त्याचा त्रास ग्रामस्थांना होऊ लागल्याने घंटागाडी बंद करण्यात आली आहे. शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 37, 33 व 43 ही जागा सरकारी मालकीची असून सदर जागा डम्पिंग ग्राऊंडकरीता उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती संतोष पाटील यांनी दिली.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. तहसील व वन विभाग यांनी तातडीने शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील नागशेत येथील सरकारी जागेची पाहाणी करावी. आणि ती जागा डम्पिंग ग्राऊंडसाठी शिघ्रे ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करावी, अशी विनंती शिघ्रे ग्रामस्थांनी केली आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा विकत घेणे, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी, कचरापेटी व अन्य बाबींसाठी मोठा निधी उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायत हद्दीतील कचर्‍याची समस्या संपुष्टात येऊन ग्रामपंचायती कचरामुक्त होऊ शकतील.

-संजय करडे, खबरबात

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply