Breaking News

खालापूर तालुक्यात पावसाचे धूमशान

खोपोली : प्रतिनिधी

खोपोलीसह खालापूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, पर्जन्यराजाच्या तुफान फटकेबाजीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिळफाटा भागातील डीसी नगरमध्ये याही वर्षी पाणी तुंबल्याने खोपोली नगरपालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडल्याची चर्चा होती. रविवारपासून पावसाची फटकेबाजी सुरू झाली, ती सोमवारी दिवसभर कायम होती. त्यामुळे खोपोली शहरातून खालापूर तालुक्यात जाणार्‍या पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला तर, शहरातील काजुवाडी व सुभाषनगर परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. या दोन्ही भागावर प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील लवजी उदय विहार भागामधील सर्व इमारतीच्या कंपाऊंडमध्ये तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढताना रहिवाशांची त्रेधातिरपीट उडत होती. तर वासरंग-लौजी रस्ता रविवारी पाण्याखाली गेल्याने अनेक दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढताना कष्ट करावे लागले. उदय विहार भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी लवजी डीपी रस्ता मध्येच फोडण्यात आला. त्यामुळे या परिसरातील वाहनचालकांना शिळफाटा येथे जाण्यासाठी चिंचवली-शेडवली रस्त्याचा आधार घ्यावा लागला. दूरसंचार कार्यालयाजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ मंदावली होती. खोपोली रेल्वे स्थानकाजवळील लोहमार्गावर पाणी आल्याने प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढत फलाटावर जावे लागत होते, मात्र कर्जत-खोपोली रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. दरम्यान, रसायनी भागातही पातळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आपटा गावात पाणी शिरले. बस स्टँड परिसर जलमय झाले होते.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply