पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात मुसळधार पावसाने सलग दोन दिवस हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील नद्या, नाले, रहदारीचे रस्ते, पाण्याने तुडुंब भरले आहेत. जनजिवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार व सोमवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने पाली, जांभुळपाड्यासह सुधागड तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. आंबा नदीवरील पाली येथील पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती, यात प्रवासी, रुग्ण, नोकरदारांचे हाल झाले. पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा तसेच तामसोली पूल व गावाला नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. तसेच तालुक्यातील पाली, पेडली व परळी बाजारपेठेत ग्राहकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले. शेतीच्या कामांनादेखील खीळ बसला आहे. पाली बसस्थानक परिसरात पाणी साचले होते.