पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारा समोरील गटारावरचा स्लॅब तुटला असल्याने मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात पाय घसरून विद्यार्थी पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याबाबत तक्रार करूनही सिडको प्रशासनाने अद्याप त्याची दुरूस्ती केलेली नाही. नवीन पनवेल सेक्टर 2मध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर फुटपाथखाली तीन ते चार फुट खोल गटार आहे. या गटारावरील स्लॅब पडल्याने त्या ठिकाणी चार बाय अडीच फुटाचा मोठा खड्डा पडला आहे. त्यामध्ये बाटल्या, दगड आणि लोखंडी सळ्यांचे तुकडे आहेत. त्याच्यावर शाळेने एक प्लायवूडचा तुकडा टाकून ठेवला आहे. शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थी त्याच्यावरून जातात. प्लायवूड मुलांच्या वजनाने तुटल्यास किवा त्याच्या गॅपमधून एखाद्या मुलाचा पाय गेल्यास अपघात होऊ शकतो. याबाबत समजल्यावर आरपीआयचे नवीन पनवेल अध्यक्ष अंकुश साळवे, उपाध्यक्ष संपत भोजने व पंचशील झोपडपट्टीचे अध्यक्ष पप्पू साळवे यांनी पाठपुरावा केला. शाळेत चौकशी केली असता प्राचार्य भेटल्या नाहीत, पण तेथील शिक्षकांनी आम्ही महापालिकेला आणि सिडकोला 8 एप्रिल रोजी पत्र दिले असून सिडकोच्या अधिकार्यानी फोटो पाहून लगेच काम करतो असे सांगितले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले, असे सांगितले.
शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या गेटवर पडलेला खड्डा धोकादायक आहेच. शाळा सुरू झाल्याने मुले तेथून जात असतात. एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावरही येईल. यामुळे ठेकेदारला ते काम ताबडतोब करून देण्याचे व त्या गटारातील कचराही साफ करण्याचे आदेश दिले आहेत.
-संतोष साळी, एईई, सिडको