केपटाऊन ः वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करीत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. स्टेनने आयपीएलपूर्वी आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याने याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने 265 सामन्यांमध्ये 699 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. त्याने 93 कसोटी सामन्यांत 439, 125 एकदिवसीय सामन्यांत 196 आणि 47 टी-20 सामन्यांत 64 विकेट्स घेतल्या आहेत. स्टेन बराच काळ संघाबाहेर होता. त्याने मार्च 2019मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. चाहत्यांमध्ये ‘स्टेन गन’ म्हणून ओळखल्या जाणार्या या वेगवान गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. स्टेन दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये स्टेनने चाहत्यांचे भरपूर प्रेम दिल्याबद्दल आभार मानले. त्याच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजीचे एक महान पर्व संपुष्टात आले आहे.
20 वर्षांचे प्रशिक्षण, सामने, प्रवास, विजय, पराजय, बंधुत्व, आनंद. सांगण्यासारख्या अनेक आठवणी आहेत. आभार मानायला अनेक चेहरे आहेत. आज मी अशा खेळातून निवृत्त होतोय जो मला खूप प्रिय आहे.
-डेल स्टेन