संजय भोपी यांची मागणी
पनवेल ः बातमीदार
मागील काही महिन्यांपासून खांदा कॉलनी परिसरात महानगर गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी जवळजवळ सर्वच रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदण्यात आले आहेत. सदर रस्ते तात्पुरत्या स्वरूपात माती व दगड टाकून बुजविण्यात आल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दररोज अपघातांच्या अनेक घटना घडताहेत. असे असताना सिडको प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. खोदकाम करण्यात आलेले सर्व रस्ते त्वरित पूर्वीप्रमाणे डांबरीकरण करून द्यावेत, अशी मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे केली आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे हे रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. सदर रस्ते पूर्ववत डांबरीकरण करण्याची जबाबदारी सिडको प्रशासनाची असल्याने खांदा कॉलनीमधील खोदकाम करण्यात आलेले सर्व रस्ते त्वरित पूर्वीप्रमाणे डांबरीकरण करून देण्यात यावेत, अन्यथा सिडको प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, अशा आशयाचा निवेदनवजा इशारा पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी दिला आहे. पाइपलाइन टाकल्यानंतरही खड्डे बुजविण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. बर्याच ठिकाणी महिनाभरानंतरही रस्त्याची अवस्था तशीच असल्याने सिडको प्रशासनाला स्थानिक रहिवाशांच्या जीवित वा वित्तहानीची कोणतीच पर्वा नाही, अशी भावना खांदा कॉलनीवासीयांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोच्या अक्षम्य दुर्लक्षाचा नाहक त्रास खांदा कॉलनीमधील रहिवासी व वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून खांदा कॉलनीमधील रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.