मुंबईत रुग्णालयाच्या कार्यक्रमात स्टेजवर भाऊगर्दी
मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईतील नायर रुग्णलयाला शनिवारी (दि. 4) शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम पार पडला, मात्र या कार्यक्रमात व्यासपीठावर सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून आले. मंत्र्यासह महापौर, पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी मिळून 20 जण एकाच वेळी स्टेजवर होते. त्यामुळे लोकांना वारंवार कोरोना नियम पाळण्यासाठी आवाहन करणार्या मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला.
या कार्यक्रमास मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, आमदार यामिनी जाधव, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी, नायर हॉसस्पिटलचे डिन रमेश भारमल, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सभागृह नेते यशवंत जाधव, आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, नगरसेवक दत्ता पोंगडे, स्वप्नील टेमकर, रमाकांत रहाटे, नगरसेविका गीता गवळी, संध्या जोशी आदी उपस्थित होते. या वेळी अनेक जण स्टेजवर उपस्थित राहिल्याने गर्दी झाली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत असतात. गर्दी होईल म्हणून त्यांनी मंदिरेही अद्याप उघडलेली नाहीत, मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय स्वत: मात्र सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करून बसल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. आता कुठे गेले नियम, असा सवालही व्यक्त होत आहे.