Tuesday , February 7 2023

संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा सज्ज; आरोग्य विभागाची आढावा बैठक

पनवेल : प्रतिनिधी

कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार (दि. 4) आयुक्त गणेश देशमुख यांनी वैद्यकिय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्टल डाके, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, अधिकारी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक, अभियंता देशमुख, डॉ. भक्तराज भोईटे, डॉ. सुरेश पंडित, स्वप्नाली चौधरी, विजय महाले, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. कळंबोली येथील सीसीआय येथीलगोदामांमधील 635 खाटांचे जम्बो कोविड सेंटर येत्या काही दिवसांत सिडको पालिकेला  हस्तांतरीत करणार आहे. या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी आवश्यक असणार्‍या सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला. पहिल्या व दुसर्‍या लाटेतील ऑक्सीजन तुटवडा लक्षात घेता तिसर्‍या लाटेमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी करण्यात येणार्‍या उपाय योजना तातडीने करण्याच्या सूचना या वेळी आयुक्तांनी दिल्या. संभाव्य तिसर्‍या लाटेमध्ये आवश्यक असणारे आयसीयू खाटा, ऑक्सीजन खाटा, साध्या खाटा, लहान मुलांच्या आयसीयू खाटा, ऑक्सीजन खाटा यांच्या नियोजनांवर चर्चा करून या अनुषंगाने खासगी रूग्णालये, शासकीय रूग्णालये तेथील सोयी सुविधा वाढविण्यावर अधिकार्‍यांनी भर द्यावा, त्या दृष्टीने तातडीने कामास लागावे. किमान तीन महिने पुरेल एवढा औषध साठा खरेदी करून ठेवावित जेणे करून ऐनवेळी औषधांची कमतरता पडणार नाही. यासाठी प्रमुख विक्रेत्याबरोबर चर्चा करावी आणि महत्त्वाची औषधे खरेदी करावी असे आदेश आयुक्तांनी या वेळी दिले. सीसीआयमधील स्वच्छता विभाग, विद्युत विभाग, सुरक्षा विभाग याठिकाणी लागणारे कर्मचारी याबाबत तसेच जेवण या कामांच्या निविदांचा आढावा घेऊन कामे त्वरीत पुर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित अधिकार्‍यांना दिल्या. तिसर्‍या लाटेत वॉर रुम अधिक सक्षम करण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा सुधारून वॉर रूम अधिक बळकट करावी. नातेवाईकांना रूग्णालयात असणार्‍या आपल्या रुग्णांची माहिती कॉल सेंटरच्या माध्यमातून देण्यासाठीचे नियोजन वॉर रूमने करावे, असे आदेश वैद्यकीय आरोग्य विभागाला दिले.

कंन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या हातांवर मारले जाणार शिक्के

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत होम आयसोलेशनमध्ये राहणारे रुग्ण अनेकदा बाहेर फिरताना दिसतात परिणामी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसते म्हणून रुग्णाच्या दोन्ही हातांवर शिक्के मारण्यात येणार आहेत. पनवेल कार्यक्षेत्रातील पाच किंवा पाच पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण असणार्‍या सोसायटी सील करण्यात येणार असून या इमारतीमधील सर्व रहिवाश्यांची चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून नागरिकांनी साजरा करावा. नागरिकांनी गर्दी न करता मास्कचा, सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. मास्क न वापरणार्‍यांवर कडक कारवाई येणार आहे. रुग्णसंख्या थोपविण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply